यंदाची आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा विराट कोहलीने आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर गाजवली. विराटने स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करताना ११ सामन्यात ७६५ धावा कुटून काढल्या. या कामगिरीच्या जोरावर विराटने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तसेच अव्वलस्थानाच्या दिशेने कूच केली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शतक आणि अंतिम फेरीत अर्धशतक फटकावणाऱ्या विराटने सध्या क्रमवारीत तिसरं स्थान पटकावलं आहे. तर रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे.
या क्रमवारीमध्ये भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल ८२६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली ७९१ गुणांसह तिसऱ्या आणि रोहित शर्मा ७६९ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असला तरी तो आणि पहिल्या क्रमांकावरील शुभमन गिल यांच्यामध्ये केवळ ३५ गुणांचं अंतर आहे. २०१७ ते २०२१ या चाक वर्षांमध्ये विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल फलंदाज म्हणून आपला वरचष्मा राखला होता. आता भारतीय संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेमधून जर विराट कोहलीला विश्रांती दिली गेली नाही तर त्याच्याकडे बाबर आझम आणि शुभमन गिलला मागे टाकत अव्वलस्थान पटकावण्याची चांगली संधी असेल.
दुसरीकडे गोलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज (७४१) गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने (७०३) एका स्थानाने प्रगती करून दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारताचा मोहम्मद सिराज (६९९) तिसऱ्या क्रमांकावर तर भारताचा जसप्रीत बुमराह (६८५) चौथ्या क्रमांकावर आहे. तर कुलदीप यादव ६६७ गुणांसह अफगाणिस्तानच्या रशिद खानसह संयुक्तरीत्या सहाव्या क्रमांकावर आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये बांगलादेशचा शाकिब अल हसन अव्वलस्थानी आहे.