Join us  

Shubman Gill: 9 षटकार आणि 11 चौकार! शुबमन गिलने गोलंदाजांना धू धू धुतले; 55 चेंडूत कुटल्या 126 धावा 

सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटक आणि पंजाब यांच्यात सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 1:02 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटक आणि पंजाब यांच्यात सामना खेळवला जात आहे. पंजाबच्या संघाने आक्रमक फलंदाजी करून 20 षटकांत 4 बाद 225 धावा केल्या आहेत. पंजाबच्या संघाकडून शुबमन गिलने शतकी खेळी केली. गिलने केवळ 55 चेंडूत 126 धावा करून कर्नाटकच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. शुबमन गिलच्या या खेळीत 9 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश आहे. त्यामुळे कर्नाटकला आता 20 षटकांत विजयासाठी 226 धावांची गरज आहे.

तत्पुर्वी, कर्नाटकच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाला अभिषेक शर्माच्या रूपात लवकर पहिला झटका बसला होता. मात्र शुबमन गिलने एकट्याने किल्ला लढवला आणि संघाची धावसंख्या दोनशे पार नेली. गिलशिवाय अनमोलप्रीत सिंगने 43 चेंडूत 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. कर्नाटकच्या एकाही गोलंदाजाला साजेशी खेळी करण्यात यश आले नाही. विद्वथ कवेरप्पाने सर्वाधिक 3 बळी पटकावून धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही यश आले नाही. त्याच्याव्यतिरिक्त कृष्णप्पा गौतम याने 1 बळी पटकावला. 

शुबमन गिलची शानदार शतकी खेळीपंजाबचा सलामीवीर शुबमन गिलने शतकी खेळी करून कर्नाटकच्या संघाला तगडे आव्हान दिले. त्याने अवघ्या 55 चेंडूत 126 धावांची खेळी केली, यामध्ये 9 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश आहे. मात्र शुबमन गिलला नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतता आले नाही, तो 19व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बाद झाला. त्याला बाद करण्यात कृष्णप्पा गौतमला यश आले. खरं तर विश्वचषकानंतर भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकांसाठी शुबमन गिलला संघात स्थान मिळाले आहे, मात्र बांगलादेश दौऱ्यातून त्याला वगळण्यात आले आहे. 

न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी टी-20 संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी एकदिवसीय संघ -शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

बांगलादेशविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघरोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल. 

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :शुभमन गिलपंजाबकर्नाटकभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App