भारताचे ‘शुभ’वर्तमान अन् उज्ज्वल भविष्य

भारतीय क्रिकेट म्हटलं की डोळ्यापुढे येतो गावसकर, तेंडुलकर आणि सध्याच्या पिढीतला कोहली. विराटचं कौतुक सारं जग करतं. विराटच्या शतकापुढे आजपर्यंत कोण टिकलंय?

By विराज भागवत | Published: June 4, 2023 09:32 AM2023-06-04T09:32:41+5:302023-06-04T09:33:28+5:30

whatsapp join usJoin us
shubman gill a rising star and future of team india | भारताचे ‘शुभ’वर्तमान अन् उज्ज्वल भविष्य

भारताचे ‘शुभ’वर्तमान अन् उज्ज्वल भविष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विराज भागवत, प्रतिनिधी, लोकमत डॉट कॉम 

भारतीय क्रिकेट म्हटलं की डोळ्यापुढे येतो गावसकर, तेंडुलकर आणि सध्याच्या पिढीतला कोहली. विराटचं कौतुक सारं जग करतं. विराटच्या शतकापुढे आजपर्यंत कोण टिकलंय? पण ‘किंग कोहली’च्या साम्राज्याला त्याच सामन्यात जोरदार प्रत्युत्तर दिलं २३ वर्षांचा शतकवीर शुभमन गिलने. शुभमनच्या खेळीपुढे विराटचं शतक अक्षरश: झाकोळून गेलं... अन् भारतीय क्रिकेटचं वर्तमान अन् भविष्य ‘शुभ’ असणार याची साऱ्यांनाच खात्री पटली.

पंजाबच्या फजिल्का गावातील एक पिता, लखविंदर सिंगने मुलाला क्रिकेटर बनवायचं स्वप्न पाहिलं आणि शुभमनची जडणघडण सुरू झाली. शेतात लखविंदर आणि सहकारी शुभमनला फलंदाजीचा सराव द्यायचे. शुभमनला बाद करणाऱ्याला १०० रुपयाचं बक्षिस असायचं. त्यामुळे सारेच जास्तीत जास्त चेंडू फेकायचे. शुभमन मात्र तासन्तास नाबाद राहायचा. त्याचा हाच चिवटपणा फलंदाजीत दिसतो. पण असा सराव कितपत फळेल, असा प्रश्न लखविंदरना पडला. ते शुभमनला मोहालीला घेऊन गेले आणि तिथून खरा तंत्रशुद्ध प्रवास सुरू झाला.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे मोहालीच्या प्रशिक्षकांनी त्याची प्रतिभा हेरली. शुभमन पंजाबकडून २०१४मध्ये १६ वर्षाखालील संघात खेळला. सलग दोन वर्ष त्याला बीसीसीआयचा ‘सर्वोत्तम ज्युनिअर क्रिकेटर’ पुरस्कारही मिळाला. पण हा तारा खरा चमकला २०१८च्या यू १९ वर्ल्डकपमध्ये. स्पर्धेत त्याने सहा सामन्यात सर्वाधिक ३७२ धावा कुटल्या, ‘मालिकावीर’ही ठरला. पाकिस्तानविरुद्धच्या शतकाने भारतीय क्रिकेटप्रेमींना त्याच्याकडे लक्ष देण्यास भाग पाडलं. मग काय, लगेचच आयपीएल २०१८ मध्ये केकेआरने त्याला १.८० कोटींच्या तगड्या बोलीवर विकत घेतलं.  आयपीएलच्या रस्त्यावर शुभमनची गाडी धावू लागली आणि जानेवारी २०१९ला त्याला ‘टीम इंडिया’चं तिकीट मिळालं. ज्या न्यूझीलंडमध्ये यू १९ वर्ल्डकप जिंकला, त्यांच्याविरुद्ध शुभमन ‘प्रतिष्ठेची  निळी जर्सी’ घालून उतरला. आयपीएल २०१९ला तो ‘सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटर’ ठरला. पाठोपाठ डिसेंबर २०२०मध्ये त्याने कसोटी संघातही जागा मिळवली. ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्याची ९१ धावांची झुंजार खेळी क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाहीत. त्याचे क्रिकेटमधले आदर्श असलेल्या तेंडुलकर, कोहलीच्या यादीत नाव येण्यासाठी शुभमन तुफान वेगाने वाटचाल करतोय. वन-डे मधलं द्विशतक असो की टी-२०मधलं शतक, ‘गिल एक्स्प्रेस’ आता सुसाट सुटलेय. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्येही त्याची झलक चाहत्यांना दिसली.

क्रिकेटमध्ये नवनवी शिखरं सर करणारा शुभमन हा तेंडुलकर, कोहलीला आदर्श मानतो; पण त्याचे विचार मात्र वेगळे आहेत. क्रिकेटसोबतच त्याला मनोरंजन विश्वाचं आकर्षण आहे. ‘स्पायडरमॅन : अक्रॉस द स्पायडर-वर्स’ चित्रपटासाठी शुभमनने नुकतंच डबिंग केलंय. स्पायडरमॅनचा भारतीय अवतार ‘पवित्र प्रभाकर’ला हिंदी, पंजाबीतला आवाज शुभमनने दिलाय. असे प्रयोग कायम करायची त्याची इच्छा आहे. तसेच अभिनयाचीही त्याला खूप आवड असल्याचे त्यानेच मुलाखतीत सांगितलंय. ‘तुम्ही जसे नाही, तसं एखादं पात्र रंगवणं आणि ते प्रेक्षकांना पटवून देणं’ हे आव्हान शुभमनला पेलायचंय. त्यामुळे भारतीय क्रिकेटचा उगवता तारा लवकरच रूपेरी पडद्यावरही चमकताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.
 

Web Title: shubman gill a rising star and future of team india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.