India vs Australia : भारतीय संघाची वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची तयारी जोरदार झाल्याचे दाखवून दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. २७ सप्टेंबरला तिसरा सामना होणार आहे आणि या सामन्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या व कुलदीप यादव यांचे पुनरागमन झाले आहे. या चौघांना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती दिली गेली होती. आता हे परतल्याने भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल नक्की पाहायला मिळतील. हाती आलेल्या वृत्तानुसार संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या वन डे साठी शुबमन गिल ( Shubman Gill) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांना विश्रांती देण्याचे ठरवले आहे.
शुबमन गिल आणि शार्दूल ठाकूर राजकोट येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम वनडेत खेळणार नाहीत कारण संघ व्यवस्थापनाने त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघे तिसर्या सामन्यासाठी राजकोटला जाणार नाहीत आणि त्याऐवजी गुवाहाटी येथे संघात सामील होतील जिथे भारताचा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामना खेळला जाणार आहे.
गिलने इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावले, हे त्याचे एकूण सहावे आणि या वर्षातील पाचवे शतक आहे. गिलने यावर्षी न्यूझीलंडविरुद्ध दोन शतके आणि बांगलादेश, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक शतके झळकावली आहेत. याचवर्षी त्याचे एक ट्वेंटी-२० शतकही आहे. शुभमन गिल २०२३ मध्ये वन डे सामन्यांमध्ये २० डावांमध्ये ७२.३५ च्या सरासरीने १२३० धावा करून आघाडीवर आहे.
संघ व्यवस्थापन गेल्या काही काळापासून वर्कलोड मॅनेजमेंटचे नियोजन करत आहे. त्यामुळेच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पहिल्या दोन वन डेतून विश्रांती देण्यात आली होती. दोन्ही वरिष्ठ खेळाडू राजकोट येथे संघात सामील होणार आहेत. जसप्रीत बुमराहला दुसऱ्या वन डेतून विश्रांती देण्यात आली होती. बीसीसीआयने ट्विट केले होते की, “तो त्याच्या कुटुंबाला भेटायला गेला आहे आणि संघ व्यवस्थापनाने त्याला थोडा ब्रेक दिला आहे. दुसऱ्या वनडेसाठी बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मुकेश कुमार संघात सामील झाला आहे. बुमराह राजकोट येथे होणाऱ्या अंतिम वनडेसाठी संघात सामील होईल.”