भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल अहमदाबादला पोहोचला आहे. गिल बुधवारी रात्री अहमदाबाद विमानतळावर पोहोचला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला होणार आहे. जर गिल खेळण्यासाठी तंदुरुस्त झाला तर त्याचे पाकिस्तानविरुद्ध खेळणे निश्चित आहे.
शुभमन गिलचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो मास्क घालून सुरक्षा कर्मचार्यांसोबत अहमदाबाद विमानतळावरून निघताना दिसला. गिलशिवाय पाकिस्तानचा संघही अहमदाबादला पोहोचला आहे. बुधवारी टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवला आणि आता भारतीय खेळाडूही अहमदाबादमध्ये आहेत. डेंग्यूपासून बरे होण्यासाठी साधारणपणे एक आठवडा लागतो आणि गिलसारखे खेळाडू लवकर बरे होऊ शकतात कारण तो आधीच तंदुरुस्त आहे. आशिया चषकापूर्वी झालेल्या यो-यो चाचणीत त्याचा स्कोअर सर्वाधिक होता.
शुभमन गिल हा भारताकडून यावर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने २० डावात १२३० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ७२.३५ आणि स्ट्राइक रेट १०५.०३ आहे. त्याने या वर्षी वनडेत द्विशतकही झळकावले आहे. शुबमन गिल हा विश्वचषकात भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे. अहमदाबादच्या मैदानात गिलचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. अशा स्थितीत त्याचे संघात पुनरागमन ही भारतासाठी अत्यंत आनंददायी बाब असेल.
दरम्यान, २०२३ च्या विश्वचषकात भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. त्याने हा सामना ६ विकेट्सने जिंकला. दुसरा सामना बुधवारी दिल्लीत झाला. या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला. कर्णधार रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. तर विराट कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावले. पाकिस्ताननंतर भारतीय संघ बांगलादेशशी भिडणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना १९ ऑक्टोबर रोजी पुण्यात होणार आहे. यानंतर धर्मशाला येथे २२ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध सामना होणार आहे.