Shubman Gill on Gujarat Titans Loss, IPL GT vs DC: गुजरातच्या अहमदाबाद स्टेडियमवर बुधवारी एक अनपेक्षित सामना पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सची गाडी घरच्या मैदानावरच रुळावरून घसरली. गुणतालिकेत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांनी तारांबळ उडवून टाकली. सुरुवातीला चांगल्या लयीत वाटणाऱ्या गुजरातचा डाव अवघ्या ८९ धावांत आटोपला. हे आव्हान दिल्लीने ४ गड्यांच्या मोबदल्यात ९ षटकांत गाठले आणि दमदार विजय मिळवला. लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिलने गुजरातच्या पराभवाचे खापर कुणावर फोडले, जाणून घेऊया.
"गुजरात टायटन्सच्या लाजिरवाण्या पराभवासाठी खेळपट्टी जबाबदार नाही. खेळपट्टी चांगली होती. हा सगळा दोष फलंदाजांचा आहे. गुजरातच्या फलंदाजांनी खराब फलंदाजी केली. आमचे शॉट सिलेक्शन खराब होते, त्याचे परिणाम संघाला भोगावे लागले. फलंदाजी पूर्णपणे मध्यम दर्जाची झाली. माझ्यासह काही फलंदाजांकडून मला खूप अपेक्षा होत्या. पण त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. जबाबदारीने खेळणे अपेक्षित होते, पण ते घडल्याचे दिसले नाही," असे शुबमन गिल म्हणाला.
सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना १७.३ षटकांत केवळ ८९ धावा केल्या आणि त्यांचा डाव आटोपला. राशिद खानने सर्वाधिक ३१ धावा केल्या. तर साई सुदर्शन (१२) आणि राहुल तेवातिया (१०) यांच्याशिवाय कोणीही दोन आकडी धावसंख्याही गाठू शकले नाही. या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने फटकेबाजीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच त्यांनी ८.५ षटकांत ९२ धावांचा पल्ला गाठला. दिल्लीकडून जेक फ्रेसर-मॅकर्गने सर्वाधिक २०, शाय होपने १९ तर रिषभ पंतने नाबाद १६ धावा केल्या. या विजयासोबत दिल्लीने ७ पैकी ३ सामने जिंकून सहावे स्थान पटकावले.