ICC ODI World Cup 2023: भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल ( Shubman Gill) याला डेंग्यूच्या उपचारासाठी चेन्नईतील रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. गिल वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही खेळू शकला नव्हता आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातूनही तो बाहेर पडला होता. मात्र आता त्याला डेंग्यूमधून पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ( India vs Pakistan ) हाय व्होल्टेज सामन्यातही खेळू शकणार नाही. गिलला शहरातील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याआधी रविवारी टीम इंडिया हॉटेलमधून एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळण्यासाठी गेली तेव्हा गिल संघासोबत नव्हता. तो हॉटेलमध्ये थांबला होता. क्रिकेट वेबसाईट क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी गिलच्या रक्त तपासणीत कमी प्लेटलेट काउंट आढळले, त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उर्वरित भारतीय संघ सोमवारीच नवी दिल्लीला रवाना झाला, जिथे बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे.