भारताचा युवा स्टार शुबमन गिल ( Shubman Gill) याच्यासाठी २०२३ हे वर्ष संस्मरणीय म्हणावं लागेल... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक, २०२३ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज... असे अनेक पराक्रम त्याने केले आहेत. या प्रवासात त्याने अनेक चढउतार पाहिले, परंतु त्यावर मात करून संघाने दाखवलेल्या विश्वासावर तो पदोपदी खरा उतरला आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही त्याची निवड झालेली आहे. आता हा युवा फलंदाज बाबर आजमनला ( Babar Azam) टक्कर देण्याच्या शर्यतीत आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) ही आनंदाची बातमी दिली आहे.
आयसीसीने आज जाहीर केलेल्या वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत बाबरने नंबर १ स्थान टिकवले आहे. मात्र, बाबरच्या या तख्ताला शुबमन गिलकडून आव्हान मिळू शकते. गिलसह युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन यानेही आयसीसी ODI batter rankings मध्ये मोठी झेप घेतलीय. आशिया चषक स्पर्धेत दोघांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. गिलने नेपाळविरुद्धच्या मस्ट विन सामन्यात नाबाद ६७ धावांची खेळी केली आणि तो कारकीर्दितील सर्वोत्तम ७५० रेटिंग पॉइंटसह तिसऱ्या स्थानावर सरकला आहे. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला एका महिन्याहून कमी कालावधी असताना गिलने मोठी झेप घेतलीय.
इशान किशनने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ८२ धावांची दमदार खेळी केली होती आणि तोही १२ स्थानांच्या सुधारणेसह २४व्या क्रमांकावर आला आहे. त्यानेही कारकीर्दितील सर्वोत्तम ६२४ रेटिंग पॉइंट्स कमावले आहेत. बाबरने आशिया चषक स्पर्धेत नेपाळविरुद्ध १५१ धावा केल्या होत्या आणि तो ८८२ रेटिंग पॉइंट्सह अव्वल स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डेर ड्यूसेने ( ७७७) दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेच्या चरिथ असालंकाने ८ स्थानांच्या सुधारणेसह २९वा क्रमांक पटकावला आहे.
गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी पाचव्या क्रमांकावर आलाय. आशिया चषक स्पर्धेत त्याने दोन सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत. हॅरिस रौफही १४ स्थानांच्या सुधारणेसह २९व्या क्रमांकावर आणि नसीम शाह १३ स्थानांच्या सुधारणेसह ६८व्या क्रमांकावर आलाय. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन १०व्या क्रमांकावर परतला आहे आणि श्रीलंकेचा महीश थीक्षणा १५ व्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियाचे जोश हेझलवूड व मिचेल स्टार्क अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.