"प्रत्येक सामन्यानंतर तुम्ही खेळाडूवर टीका करू शकत नाही. या गोष्टी घडतच असतात याची सर्वांना कल्पना आहे. शुबमन चांगली फलंदाजी करत आहे आणि तो आमच्यासाठी तिन्ही फॉरमॅटचा एक महत्त्वाचा भाग आहे,''असे विधान करून भारतीय संघाच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने युवा फलंदाज शुबमन गिल याची पाठराखण केली होती. दुसऱ्या वन डे सामन्यातही शुबमनला काही खास करता आले नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो प्रभाव पाडू शकला नव्हता आणि दोन वन डे सामन्यांत अनुक्रमे त्याने ७ व ३४ धावा केल्या आहेत. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी शिखर धवनला संघात पुन्हा घेण्याची मागणी होत आहे. अशात शुबमनने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याचा मोठा विक्रम मोडला आहे.
३१ जानेवारी २०१९ मध्ये शुबमन गिलने भारताच्या वन डे संघात पदार्पण केले. पण, तेव्हा तो संघाचा कायमस्वरूपी सदस्य नव्हता. मात्र, मागील वर्षभरात त्याने वन डे संघातील स्थान मजबूत केले आहे. त्याने द्विशतकही झळकावले आहे. २६ सामन्यांत ६१.४५ च्या सरासरीने त्याने १३५२ धावा करताना ४ शतकं व ५ अर्धशतकं झळकावली आहेत. २०८ ही त्याची वन डेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. ट्वेंटी-२०तही त्याने चांगला दम दाखवला आहे. पण, मागील काही सामन्यांत त्याची कामगिरी फार चांगली झालेली नाही. पण, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात ३४ धावांची खेळी विक्रमाला गवसणी घालणारी ठरली आहे.
वन डे क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या २६ इनिंग्जमध्ये सर्वाधिक १३५२ धावांचा विक्रम गिलने नावावर केला आहे. यापूर्वी बाबर आजमनच्या ( १३२२) नावावर हा विक्रम होता. आता पाकिस्तानी कर्णधार दुसऱ्या स्थानावर गेला असून त्यानंतर जॉनथन ट्रॉट ( १३०३), फखर जमान ( १२७५) आणि रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन (१२६७) यांचा क्रमांक येतो. मागील १२ महिन्यांत भारताकूडन वन डे क्रिकेटमध्ये गिलने सर्वाधिक १०९८ धावा केल्या आहेत, तर विराट कोहली ( ५५४) व इशान किशन ( ५२९) हे त्याच्या नंतर येत आहेत.
Web Title: Shubman Gill has scored most runs in ODI after 26 innings, Over-takes the record held by Babar Azam.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.