बेंगळुरूः 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आपल्या झंझावाती फलंदाजीनं क्रिकेटप्रेमींची मन जिंकणारा टीम इंडियाचा स्टार शुभमन गिल यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये धडाकेबाज कामगिरी केलीय. 'पंजाब दा पुत्तर' शुभमननं कर्नाटकच्या गोलंदाजांची धुलाई करत नाबाद 123 धावा कुटल्या. या खेळीत 8 चौकारांसह 6 षटकार ठोकत त्याने 'सिक्सर सम्राट' युवराजसिंग आणि 'फिरकी किंग' हरभजनसिंगच्या जुन्या विक्रमाशी बरोबरी केली. युवी आणि भज्जीनेही पंजाबसाठी एका डावात सर्वाधिक सहा षटकार लगावण्याचा पराक्रम केला होता.
पंजाब आणि कर्नाटक या तुल्यबळ संघांमध्ये कोण बाजी मारणार, याबद्दल क्रिकेटप्रेमींना उत्सुकता होती. वर्ल्ड कपचा हिरो शुभमनची बॅट इथेही तळपते का, यावर क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळल्या होत्या. त्यांची इच्छा ओळखून, शुभमननं देधडक शतक झळकावलं. 122 चेंडूत 123 धावांच्या त्याच्या खेळीच्या जोरावर 269 धावांचा डोंगर रचला. तो सर करण्यासाठी कर्नाटकच्या शिलेदारांनी प्रयत्नांची शर्थ केली. कर्नाटकचा सलामीवीर के एल राहुलनं 91 चेंडूत 107 धावा तडकावल्या. पण, हे शतक वाया गेलं. यजमानांना 8 बाद 265 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि चुरशीच्या लढाईत पंजाबने 'बल्ले बल्ले' केलं.
18 वर्षांचा शुभमन अनुभवी गोलंदाजांपुढे टिकाव धरू शकेल का, या प्रश्नाचं उत्तर त्यानं आज दिलं आहे. आयपीएल स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सनं 1.8 कोटी रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतलंय. त्यांची निवड चुकली नसल्याचं शुभमननं दाखवून दिलंय. आता प्रत्यक्ष स्पर्धेत तो कशी चमक दाखवतो, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.