Shubman Gill Umpire IPL 2024 LSG vs GT: गुजरात टायटन्स संघाला लखनौ विरूद्धच्या सामन्यात हार पत्करावी लागली. लखनौच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघाला केवळ १३० धावाच करता आल्या. लखनौच्या संघाने सामना ३३ धावांनी जिंकत गुणतालिकेत ६ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. या सामन्यात एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. कर्णधार झाल्यानंतर खेळाडू अधिक आक्रमक होतो असे म्हणतात. त्याचा प्रत्यय या सामन्यात आला. एरवी शांत आणि संयमी दिसणारा शुबमन गिल या सामन्यात पंचांशी वाद घालताना आक्रमक झाल्याचे दिसून आले. जाणून घेऊया नक्की काय घडला प्रकार...
या गोष्टीमुळे शुबमन गिल भडकला...
सामना सुरु होताच पहिल्याच षटकात हा प्रकार घडला. उमेश यादवने आधी चौथ्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला माघारी धाडले. त्यानंतर नवीन फलंदाज देवदत्त पडिक्कल क्रीझवर आला. उमेशच्या पुढच्याच चेंडूवर पुन्हा LBW साठी अपील करण्यात आले. अंपायरने नॉट आऊट दिल्यावर DRS घेण्यात आला. त्यात सुपर रिप्लेमध्ये घडलेला प्रकार पाहून शुबमन गिलचा पारा चढला. निर्णय येताच शुभमन गिल संतापला आणि थेट पंचांवर धावून गेला. खरे पाहता, तिसऱ्या पंचांनी रिप्लेमध्ये केवळ सामान्य रिप्ले पाहिला होता. अल्ट्राएज रिप्ले दाखवण्यात आला नाही, ज्यावरून चेंडू बॅटला लागला आहे की नाही हे कळते. तो रिप्ले मैदानावरील मोठ्या पडद्यावर दिसला नसल्याने गिल संतापला. मग मैदानावरील अंपायरने तिसऱ्या पंचांशी बोलून चेंडू बॅटला लागल्याची खात्री केली आणि त्यानंतर प्रकरण शांत झाले.
लखनौचा गुजरातवर सहज विजय
लखनौकडून मार्कस स्टॉयनीसने सर्वाधिक ४३ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. तर कर्णधार केएल राहुलने ३१ चेंडूत ३३ आणि निकोलस पूरनने २२ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या. या खेळींच्या जोरावर लखनौने २० षटकात ५ बाद १६३ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यश ठाकूरने गुजरातच्या डावाला सुरूंग लावला. त्याने ३० धावा देऊन ५ बळी टिपले. गुजरातकडून साई सुदर्शनने २३ चेंडूत ३१, राहुल तेवातियाने २५ चेंडूत ३० आणि शुबमन गिलने २१ चेंडूत १९ धावा करत थोडीफार झुंज दिली. पण लखनौच्या गोलंदाजीपुढे गुजरातचा डाव १३० धावांवरच आटोपला आणि लखनौने ३३ धावांनी सामना जिंकला.