शुबमन गिलने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये तिसऱ्या शतकाची नोंद करून गुजरात टायटन्सला फायलनमध्ये प्रवेश मिळवून दिला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुबमन गिलने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. या शतकासह गिलने अनेक विक्रमांची नोंद केली, परंतु विराट कोहलीचा एक अविश्वसनीय विक्रमही आता गिलच्या नावावर नोंदवला गेला आहे. गिलने २०२३ हे वर्ष गाजवलं आहे... कसोटी क्रिकेट, ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक आणि वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक त्याने यंदा झळकावले आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गिलने फॉर्म कायम राखताना गुजरातच्या घरच्या मैदानावर ५००+ धावांचा करण्याचा पराक्रम केला. आयपीएलच्या एका पर्वात तीन किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो विराट कोहलीनंतर ( २०१६) दुसरा भारतीय ठरला. विराटने २०१६मध्ये चार शतकं झळकावली होती. २०२२ मध्ये जॉस बटलरने ४ शतकं झळकावून विराटच्या विक्रमाशी बरोबरी केली. शिवाय विराट नंतर ( ९७३) आयपीएलच्या एका पर्वात ८००+ धावा करणारा गिल हा दुसरा भारतीय आहे. याही विक्रमात जॉस बटलर ( ८६३ धावा, २०२२) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
गिलने या सामन्यात ६० धावांत ८ षटकार व ४ चौकारांच्या मदतीने १२९ धावांची खेळी केली. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारा तो विराटनंतर दुसरा वेगवान भारतीय फलंदाज ठरला. विराटने २०१६मध्ये १८ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला होता, तर गिलने यंदा २२ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडला.