नवी दिल्ली - शुभमन गिल प्रतिभावान खेळाडू असला तरी त्याच्यातील प्रतिभा केवळ मर्यादित षटकांपुरती मर्यादित आहे. तसेच सपाट खेळपट्ट्यांवरच तो यशस्वी होऊ शकतो, असे परखड मत भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने व्यक्त केले आहे. फलंदाजी करताना पदलालित्य सुधारणे आणि लाल चेंडू खेळताना तंत्रात बदल करणे, हे दोन उपायही कैफने शुभमनसाठी सुचविले आहेत.
एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत कैफ म्हणाला की, कसोटी क्रिकेटमध्ये कधीच तुम्हाला सपाट खेळपट्ट्या मिळणार नाहीत. चेंडू उसळी घेईल किंवा स्पिन होईल. पण, सरळ रेषेत कधीच तो पडणार नाही. त्यामुळे गिलने सर्वप्रथम फुटवर्क सुधारायला हवे. हैदराबाद कसोटी सामन्यात काही भारतीय फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. काहींनी अर्धशतकेही झळकावली. मात्र, एकालाही त्याचे शतकात किंवा द्विशतकात रूपांतर करता आले नाही. यामुळेच भारतीय संघ सामन्यात माघारला. एकूणच भारतीय फलंदाजांची फिरकी गोलंदाजी खेळण्याची क्षमता कमी झाली आहे, असे निरीक्षण कैफने नोंदवले.
गिलची आकडेवारी
२४ वर्षांच्या शुभमन गिलची वनडे क्रिकेटमधील आकडेवारी शानदार आहे. ४४ वनडे सामन्यांमध्ये त्याने ६१.३७ची सरासरी आणि १०३.४६च्या स्ट्राइक रेटने २,२७१ धावा काढल्या आहेत. यामध्ये ६ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत मात्र गिलची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. २१ कसोटी सामन्यांमध्ये त्याला २९.५२च्या सरासरीने केवळ १,०६३ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान केवळ दोनदा गिलेने शतकाची वेस ओलांडली.
Web Title: 'Shubman Gill limited overs batsman'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.