Team India Captaincy: भारतीय संघ सध्या एका नव्या पद्धतीने उदयाला येत आहे. राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अनेक मालिका जिंकल्या आणि टी२० विश्वचषकावरही नाव कोरले. द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर आता गौतम गंभीरवर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारत-श्रीलंका या मालिका ही त्याची पहिली परीक्षा असणार आहे. या दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर झाला असून त्यात काही बदल दिसून आले आहेत. महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय क्रिकेटमधील युवा शुबमन गिलकडे ( Shubman Gill ) वनडे आणि टी२० अशा दोनही संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर सूर्यकुमार यादवला (Suryakumar yadav ) टी२० चा कर्णधार केले आहे. याचदरम्यान, भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी एक मोठे विधान केले आहे.
"मला वाटतं की विराट आणि रोहित हे कर्णधार असताना त्यांचा खेळ सर्वाधिक बहरला. हीच प्रतिभा शुबमन गिलमध्येही आहे असं मला वाटतं. तो अजूनही कर्णधार झालेला नसला तरीही तो आता उपकर्णधार आहे. त्याच्यात एका टीमकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची प्रतिभा आहे. मला शुबमनबद्दल खात्री आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या संघाचे नेतृत्व करत असता तेव्हा त्या गोष्टीमुळे तुम्हाला अतिरिक्त जबाबदारी घ्यावी लागते आणि तुमच्या प्रतिभेचा कस लागतो. शुबमन गिलसारख्या युवा खेळाडूमध्ये ती पात्रता आहे आणि भविष्यात गिल तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतो," असे स्पष्ट मत राठोड यांनी व्यक्त केले.
"मी जेव्हा शुबमनला पहिल्यांदा नेट्समध्ये खेळताना पाहिले तेव्हा मलाही इतरांप्रमाणेच अचंबित व्हायला झाले होते. सुरुवातीपासूनच लोक आणि काही जाणकार त्याच्या फलंदाजीतील खास प्रतिभेबाबत चर्चा करत होते. त्याला पहिल्यांदा जेव्हा सामन्यात खेळताना पाहिले तेव्हा मला दिसलं की हा अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. त्याला खेळाची गरज नीट समजते. वेगवेगळ्या परिस्थितीत कशी फलंदाजी करावी याची त्याला चांगली समज आहे. त्यामुळेच आव्हान कितीही मोठं असेल तरी तो मागे हटत नाही," असेही ते म्हणाले.