ICC ODI & T20I batters ranking - शुबमन गिलने ( Shubman Gill) ट्वेंटी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली नसली तरी वन डे क्रिकेटमध्ये त्याने पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना धडकी भरेल अशी झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आज क्रमवारी जाहीर केली आणि त्यात शुबमन गिल व इशान किशन यांनी मोठी झेप घेतली. भारताने नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत २-१ अशी बाजी मारली. तीन सामन्यांच्या मालिकेत या जोडीने ३१० धावा केल्या आहेत आणि या दोघांनी वन डे क्रमवारीत सर्वोत्तम वैयक्तिक झेप घेतली आहे.
शुबमन गिल दोन स्थानांच्या सुधारणेसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या दोन फलंदाजांचं टेंशन वाढलं आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ८८६ रेटिंग पॉइंटसह अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डेह ड्युसेन ( ७७७), पाकिस्तानचे फखर जमन ( ७५५) व इमाम-उल-हक ( ७४५) यांचा क्रमांक येतो. शुबमनचे ७४३ रेटींग पॉइंट झाले आहेत आणि तो पाकिस्तानच्या फखर व इमाम यांना मागे टाकू शकतो. इशान किशननेही ९ क्रमांकाच्या सुधारणेसह ३६व्या स्थानावर झेप घेतलीय.
टॉप १० मध्ये शुबमननंतर विराट कोहली नवव्या स्थानावर आहे, तर रोहित शर्मा ११व्या क्रमांकावर आहे. शिखर धवन ( ४०) व लोकेश राहुल ( ४६) यांचा क्रमांक नंतर येतो. हार्दिक पांड्याने १० क्रमांकाची झेप घेत ७१वे स्थान पटकावले आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिकने ५ स्थानांची झेप घेत ११वा क्रमांक पटकावला आहे. कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांनीही अनुक्रमे १०व्या व ३०व्या स्थानी झेप घेतली. भारताचा तिलक वर्मा ट्वेंटी-२० क्रमवारीत ४६व्या क्रमांकावर आला आहे. त्याने विंडीजविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेत पदार्पण करताना दमदार कामगिरी केली आहे.