ICC ODI Rankings : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्व आघाडींवर भारतीय खेळाडूंनी सरस कामगिरी केली आहे. शुबमन गिलची बॅट अपेक्षित तळपली नसली तरी रोहित शर्मासोबत तो खेळपट्टीवर जम बसवून उभा राहिला आहे. विराट कोहलीचा फॉर्म प्रतिस्पर्धींना धडकी भरवणारा आहे. अशात आयसीसीने आज जाहीर केलेल्या वन डे क्रमवारीत भारताच्या फलंदाजांचा डंका दिसतोय. तेच दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम संकटात सापडला आहे.
...अन् बाबर आजमचा 'काटा' काढायचा प्लान तेव्हाच ठरला; पाकिस्तान संघातील कारस्थानी कोण?
आयसीसीने जाहीर केलेल्या वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर आजमने नंबर वन स्थान टिकवले असले तरी त्याच्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शुबमन गिल यांच्यातले रेटींग पॉईंटचे अंतर कमी झाले आहे. आता फक्त ६ रेटींग पॉईंटने बाबर पुढे आहे आणि त्याचा निराशाजनक खेळ पाहता तो या क्रमांकावर फार काळ टिकेल असे वाटत नाही. बाबरला वर्ल्ड कप स्पर्धेत ५ सामन्यांत १५७ धावा करता आल्या आहेत आणि त्याचे रेटींग पॉईंट ८२९ इतके कमी झाले आहेत. शुबमन ८२३ रेटींग पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरला केवळ शुबमनकडूनच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेचा ओपनर क्विंटन डी कॉक याच्याकडूनही धोका आहे. क्विंटनने या वर्ल्ड कपमध्ये ३ शतकं झळकावली आहेत आणि तो ३ स्थानांच्या सुधारणेसह ७६९ रेटींग पॉईंटसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. आफ्रिकेचाच हेनरिच क्लासेन ( ७५६) ४ स्थानांच्या सुधारणेसह चौथ्या क्रमांकावर आला आहे.