भारतात सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. न्यूझीलंड आणि भारत हे दोनच संघ सध्या वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित आहेत. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) त्याच्या बॅटमधून धावांची आग ओकतोय... विराट कोहली व शुबमन गिल यांची बॅट काही शांत नाही आणि त्याचा फायदा त्यांना आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत झालेला पाहायला मिळतोय. शुबमनने दुसरे स्थान कायम राखले असताना रोहित व विराट यांनीही मोठी झेप घेतलीय आणि भारतीयांनी मिळून एक वेगळा पराक्रम केला आहे.
भारत, न्यूझीलंड यांची गाडी सुसाट; 'डच'च्या धक्क्यामुळे उर्वरित दोन जागांसाठी शर्यत जबराट
रोहितसह क्विंटन डी कॉक आणि ट्रेंट बोल्ट यांनीही वन डे क्रमवारीत सुधारणा केली आहे. डी कॉक तिसऱ्या क्रमांकावर आला आहे आणि त्याने संघ सहकारी रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन याला चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे. रोहित सहाव्या क्रमांकावर आहे आणि विराट कोहली ८व्या क्रमांकावर आहे. आयसीसीच्या वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल १० मध्ये भारताचे ३ फलंदाज आहेत आणि असा पराक्रम अन्य संघांना जमलेला नाही. रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध १३१ धावा कुटलेल्या आणि पाकिस्तानविरुद्ध ६३ चेंडूंत ८६ धावांची खेळी केली होती.
अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाझ ( १९ स्थानांच्या सुधारणेसह १८व्या क्रमांकावर) आणि नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स ( १६ स्थानांच्या सुधारणेसह २७व्या क्रमांकावर) यांनी आगेकूच केलीय. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ८३६ रेटींग गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे आणि त्याने गिल व त्याच्यातील अंतर १८ गुणांनी वाढवले आहे. गिलला आजारपणामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळता आले नव्हते.