Duleep Trophy 2024, IND A vs IND D : दुलिप करंडक स्पर्धेतील भारत 'अ' आणि भारत 'ड' यांच्यातील सामना अनंतपूरच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्या डावात भारत २९० धावांत आटोपलेल्या भारत 'अ' संघाने श्रेयस अय्यरच्या भारत 'ड' संघाला पहिल्या डावात १८३ धावांत गुंडाळले. त्यानंतर आता दुसऱ्या डावात भारत 'अ' संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.तिसऱ्या दिवशी भारत 'अ' संघाने दुसऱ्या सेशनमध्येच ३६० पेक्षा अधिक धावांची भक्कम आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. यात संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी मोलाचा वाटा उचलला.
प्रथम सिंगचा क्लास शो! अगदी तोऱ्यात साजरं केलं प्रथम श्रेणीतील दुसरं शतक
सलामीचा फलंदाज प्रथम सिंग आणि कर्णधार मयांक अग्रवाल या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली. मयंक अग्रवाल ५६ (८७) अर्धशतकी खेळी करून परतल्यावर प्रथम सिंग याने धमाकेदार शतक झळकावले. खणखणीत चौकारानं त्यानं शतकाला गवसणी घातली. यासाठी त्याने १४९ चेंडूंचा सामना केला. त्याचे प्रथम श्रेणीतील दुसरे आणि दुलिप करंडक स्पर्धेतील हे पहिलेच शतक आहे. या सामन्यात प्रथम याने १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १८९ चेंडूत १२२ धावांची खेळी केली.
शुबमन गिलच्या जागी मिळाली संधी प्रथम सिंग दुलिप करंडक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारत 'अ' संघाचा भाग नव्हता. कारण पहिल्या मॅचमध्ये शुबमन गिल सलामीच्या रुपात या संघाकडून खेळताना दिसले होते. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शुबमन गिल याला या स्पर्धेतून रिलीज केल्यावर त्याच्या जागी प्रथम सिंगला संधी देण्यात आली होती. या संधीच त्यानं सोनं करून दाखवलं आहे.
शाहरुखच्या KKR च्या ताफ्यातही दिसलाय हा गडी, पण
देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेल्वे संघाचे प्रतिनिधीत्व करणारा ३२ वर्षीय प्रथम सिंग हा IPL संघाचाही भाग राहिला आहे. २०१७ च्या लिलावात गुजरात लायन्सनं त्याच्यावर बोली लावली होती. पण त्या हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर २०२२ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतल्याचे पाहायला मिळाले होते. त्याच्यासाठी शाहरुखच्या संघाने २० लाख या बेस प्राइजसह त्याच्यासोबत डील केली होती. पण हे कनेक्शनही बिन कामाचं ठरलं. कारण त्याला या संघानंही एकही सामना खेळण्याची संधी दिली नव्हती.