कोलकाता : माझ्याकडे पर्याय उपलब्ध असेल तर नेहमीसाठी केकेआरकडून खेळणे आवडेल, असे प्रतिभावान फलंदाज शुभमन गिल याने म्हटले आहे. गिल सध्या दुखापतीतून सावरत असून, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी गेलेल्या संघाबाहेर आहे.
केकेआर व्यवस्थापनाने त्याला रिलिज केले असून सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांना मात्र रिटेन केले. २२ वर्षांचा सलामीच्या या भारतीय फलंदाजाकडे केकेआरचा भविष्यातील कर्णधार यादृष्टीने पाहिले जात होते. मात्र संघाने त्याच्यासह इयोन मोर्गन, दिनेश कार्तिक, राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा आदींना रिलिज केले.
‘लव्ह फेथ ॲन्ड बियॉन्ड’ या लघुपटात गिल म्हणाला, ‘केकेआर संघासोबतचे माझे नाते ‘विशेष’ आहे. एकदा आपण एखाद्या संघासोबत जुळलो की त्याच संघात कायम राहू इच्छितो, शिवाय त्याच संघाकडून खेळू इच्छितो. मला केकेआरकडून खेळण्याचा पर्याय उपलब्ध झाल्यास, मी नेहमी याच संघाकडून खेळत राहीन.’
२०१८ च्या आयपीएलआधी केकेआरने गिलला १.८ कोटी रुपयात खरेदी केले होते. पहिल्याच सत्रात त्याने १३ सामन्यात २०३ धावा काढल्या. नंतर त्याची धावा काढण्याची गती कमी होताच टीकादेखील झाली होती. त्याने केकेआरसाठी ५८ सामन्यात १२३ च्या स्ट्राईक रेटने १४१७ धावा केल्या आहेत. केकेआरचे एमडी आणि सीईओ वेंकी मैसूर म्हणाले, ‘बरेच खेळाडू असे आहेत की ज्यांना आपण रिटेन करण्यास इच्छुक असतो, मात्र नियमावलीमुळे मर्यादा येतात.’