Shubman Gill Rahul Dravid: न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने क्लीन स्वीपसह विजय मिळवला. या मालिकेत २३ वर्षीय युवा सलामीवीर शुभमन गिलने दणका दिला. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने २०८ धावांची द्विशतकी खेळी केली. दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद ४० धावा केल्या. तर तिसऱ्या सामन्यात ११२ धावांची शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. शुबमन गिलला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.
न्यूझीलंड विरूद्धच्या या मालिकेत तीन सामन्यांत त्याने ३६० धावा केल्या. या मालिकेपूर्वी गिलने आपल्या कारकिर्दीची चांगली सुरूवात केली होती, पण त्याला त्या खेळींचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नव्हते. त्यामुळे त्याचे वडील चांगलेच रागावले होते. रिमझिम पावसासारखंच खेळणारेस का, तुफानी खेळी कधी दिसणार? असे त्याचे वडील त्याला म्हणाले होते. या मुद्द्यावरून भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडने एक किस्सा सांगितला.
BCCI ने शेअर केला मुलाखतीचा व्हिडिओ
टीम इंडिया प्रशिक्षक राहुल द्रविडने शुबमन गिलला त्याच्या वडिलांच्या याच शब्दांची आठवण करून दिली. वास्तविक, द्रविडने या मालिकेनंतर गिलची मुलाखत घेतली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला. द्रविड म्हणाला, "शुबमन गिल अनेक वेळा ५०-६० धावांपर्यंत पोहोचायचा. पण त्याचे शतकात रूपांतर करत नव्हता. मला वाटते की त्याचे वडील म्हणाले होते की शुभमन गिल, तू फक्त रिमझिम पाऊस दाखवतोस. आम्हाला खरोखर पाऊस किंवा वादळ दिसेल का? मला वाटतं गेल्या एका महिन्यात तू जे काही केलं आहेस, त्याचा तुझ्या वडिलांना नक्कीच अभिमान वाटेल.
गिलने दिलं भन्नाट उत्तर
"हो, त्यांना अभिमान वाटत असेल असं वाटतं पण मला वाटत नाही की ते या खेळाने फार खूश असतील. कारण ही सुरूवात आहे. ते मला नक्कीच सांगतील की मी हा फॉर्म कायम राखला पाहिजे. मी असेच खेळत राहिले पाहिजे. मला आता आणखी एक मोठी धावसंख्या करायला हवी."
शुबमनने केली बाबर आझमच्या विक्रमाशी बरोबरी
दरम्यान, शुबमन गिलनेही तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. त्याने या मालिकेत ३१४+ धावा करताना विराट कोहलीचा (२८३ धावा वि. श्रीलंका, २०२३) विक्रम मोडला. रोहित शर्मा व शुभमन गिल यांची २०६ धावांची भागीदाही ही न्यूझीलंडविरुद्ध भारतीयांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. रोहित शर्मा ८५ चेंडूंत ९ चौकार व ६ षटकार खेचून १०१ धावांवर बाद झाला. शुभमन गिल ७८ चेंडूंत १३ चौकार व ५ षटकारांसह ११२ धावांवर माघारी परतला. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत सर्वाधिक ३६० धावा करण्याच्या बाबर आजमच्या विक्रमाशी शुभमनने आज बरोबरी केली. बाबरने २०१६मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १२०च्या सरासरीने ३६० धावा केल्या होत्या. शुभमनने न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत १८०च्या सरासरीने ३६० धावा करून बाबरशी बरोबरी केली.