Shubman Gill sister Shahneel Gill Trolling: शुबमन गिलने आयपीएलमध्ये (IPL 2023) आपले दुसरे शतक झळकावून विराट आर्मीला बाहेरचा रस्ता दाखवला. गुजरात टायटन्सने १९९ धावांचे तगडे आव्हान १९.१ षटकांतच गाठले अन् ५ चेंडू आणि ६ गडी राखून विजय साकारला. विराट कोहली आणि शुबमन गिल या दोन्ही भारतीय शिलेदारांनी शतक ठोकून सामना अविस्मरणीय केला. पण गिलच्या शतकामुळे मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये धडक मारली, तर आरसीबीचे आव्हान संपुष्टात आले. आरसीबीच्या पराभवानंतर शुबमन गिलची बहिण शाहनील गिलला सोशल मीडियावर शिवीगाळ केली गेली. या प्रकरणाची दखल घेत आता दिल्ली महिला आयोगानेही यात उडी घेतली आहे. क्रिकेटर शुभमन गिलच्या बहिणीला ट्रोल, शिवीगाळ, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी नोटीस दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना दिली आहे.
आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा शतकासह पराभव केल्यानंतर गिल आणि त्याच्या बहिणीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत ट्रोल केले जात होते. आयोगाने नोटीसमध्ये म्हटले आहे की, 'शुबमन गिलच्या बहिणीसाठी ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या या पोस्ट अश्लील, धमकावणाऱ्या आणि अपमानास्पद आहेत, तिला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकीही दिली जात आहे. हा एकप्रकारचा गुन्हा आहे. ही बाब अतिशय गंभीर असून त्यावर तातडीने कारवाई करा.
आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी ही नोटीस ट्विटरवर शेअर केली आणि दिल्ली पोलिसांना २६ मे पर्यंत केलेल्या कारवाईची माहिती देण्यास सांगितले. इंस्टाग्रामवर शाहनील 1.10 लाख फॉलोअर्ससह खूप लोकप्रिय आहे. आयपीएलमध्ये, ती गुजरात टायटन्स संघाच्या इतर खेळाडूंच्या कुटुंबासह हँग आउट करताना दिसू शकते. तेही मैदानात उतरले आहेत. तिथून अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होत राहतात. या फोटोंवर ट्रोलर्स सातत्याने अनेक अपमानास्पद आणि अश्लील कमेंट करत आहेत. आयपीएलमधील आरसीबीची मोहीम संपुष्टात आणल्याबद्दल काही वापरकर्त्यांनी शुभमन गिलला लक्ष्य केले.