ICC World Cup 2023 : वन डे विश्वचषकाच्या सुरूवातीलाच यजमान भारतीय संघाला मोठा झटका बसल्याचे दिसते आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल डेंग्यूच्या आजारामुळे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्याला मुकला होता. तसेच तो बुधवारी होणाऱ्या अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात देखील अनुपस्थित असणार आहे. अशातच १४ ऑक्टोबरला होणाऱ्या पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याला देखील गिल मुकण्याची दाट शक्यता आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, वरिष्ठ राष्ट्रीय क्रिकेट समिती उर्वरित सामन्यांसाठी शुबमन गिलच्या सहभागाबद्दल लवकरच निर्णय घेणार आहे. माहितीनुसार, निवड समिती गिलच्या जागी एका खेळाडूचा समावेश करण्यासाठी संघ व्यवस्थापनाशी चर्चा करण्यास तयार आहे. संघाने निवड समितीला विनंती केल्यास, यशस्वी जैस्वाल किंवा ऋतुराज गायकवाड यांना बॅकअप म्हणून संघात स्थान मिळू शकते. डेंग्यूने त्रस्त असलेल्या शुबमन गिलला चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गिलच्या आजारपणामुळे अ'शुभ' संकेतदरम्यान, १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या मैदानावर गिलची कामगिरी चांगली राहिली आहे. पण, मागील एक वर्षापासून शानदार फॉर्ममध्ये असलेल्या गिलच्या आजारपणाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. मागील आठवड्यात भारतीय संघ चेन्नईत दाखल झाल्यानंतर गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटीव्ह आली होती.
वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
वन डे विश्वचषकातील भारताचे पुढील सामने - भारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू