IPL 2022 मधील गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये सोमवारचा सामना रंगला असून त्यात लखनौ संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. गुजरात आणि लखनौ दोन्ही संघ IPL मध्ये पहिल्यांदाच खेळत असल्याने त्याच्या खेळीकडे विशेष लक्ष होतं. पहिल्याच सामन्यात गुजरात संघाने लखनौच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. मोहम्मद शमीने सामन्याच्या पहिल्या चेंडूवर कर्णधार लोकेश राहुलला बाद केलं. तर दुसऱ्या षटकात क्विंंटन डी कॉकलाही क्लीन बोल्ड केलं. पण वरूण अरोनच्या गोलंदाजीवर एव्हिन लुईसचा शुबमन गिलने घेतलेला कॅच विशेष चर्चेत राहिला.
दोन गडी स्वस्तात बाद झालेले असताना संघावरील दडपण कमी करण्याच्या उद्देशाने एव्हिन लुईस फटकेबाजी करायला गेला. त्याने २ चौकार मारलेदेखील होते, पण वरूण अरोनने चलाखीने त्याला बाऊन्सर टाकला. त्याला तो चेंडू नीट टोलवता आला नाही, त्यामुळे चेंडू जास्त उंच गेला. त्यावेळी शुबमन गिलने अतिशय वेगाने मागे पळत जाऊन हवेत उडी मारून सुपरमॅनसारखा तो झेल टिपला आणि साऱ्यांनाच अवाक् केले.
शुबमन गिलच्या त्या दमदार फिल्डिंगच्या जोरावर धोकादायक वाटणारा वरूण अरोन स्वस्तात बाद झाला. त्याने ९ चेंडूत १० धावा केल्या. त्याआधी राहुल पहिल्याच चेंडूवर शू्न्यावर बाद झाला होता. तर क्विंटन डी कॉकही ७ धावा काढून माघारी परतला.