Shubman Gill Dengue, World Cup 2023: भारतात वर्ल्ड कप स्पर्धेला गुरूवारपासून सुरूवात झाली. पहिल्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला न्यूझीलंडने पराभूत केले. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा क्रिकेटर शुभमन गिलचीडेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर साशंकता असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी काही चाचण्यांनंतर संघ व्यवस्थापन स्टार फलंदाजाच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेईल असे बोलले जात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यापूर्वी तो आजारी पडला होता. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली. आता अशा परिस्थितीत हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
भारतीय संघ रविवारी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकातील सलामीचा सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत या सामन्यापूर्वी टीम इंडिया स्टार फलंदाज शुभमन गिलशिवाय मैदानात उतरू शकते. टीम इंडियाचा हा स्टार फलंदाज गुरुवारी चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या टीम इंडियाच्या नेट सेशनमध्येही सहभागी झाला नव्हता, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. यानंतर त्याच्या डेंग्यूशी संबंधित चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो पहिला सामना खेळू शकेल की नाही? या संदर्भात परिस्थिती स्पष्ट नाही. परंतु बीसीसीआयचे वैद्यकीय पथक या स्टार फलंदाजाच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.
या प्रकरणाशी संबंधित लोकांनी सांगितले की, टीम इंडियाचे व्यवस्थापन गिलच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. शुक्रवारी चाचणीची दुसरी फेरी होणार आहे. यानंतरच शुभमन गिल कांगारूबद्दल निर्णय घेता येईल.
गिल नसेल तर कोणाची लागणार वर्णी?
शुभमन गिल चेन्नईच्या चेपॉकमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळू शकला नाही, तर या सामन्यात टीम इंडियाचा दुसरा सलामीवीर कोण हा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत या महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्मासोबत त्याच्या जागी इशान किशन सलामी करू शकतो अशी चर्चा आहे. याशिवाय केएल राहुल देखील सलामी करायला उतरू शकतो असेही बोलले जात आहे.