मुंबई : आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीचा संघ चमकदार कामगिरी करून किताब पटकावेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण गतविजेत्या गुजरात टायटन्सने आरसीबीच्या स्वप्नावर पाणी टाकले अन् विराट आर्मीला बाहेरचा रस्ता दाखवला. शुबमन गिलने १०४ धावांची शतकी खेळी करून विराटच्या शतकाचा देखील पराभव केला. खरं तर कालच्या सामन्यात गिल आणि विराट कोहली यांनी शतक झळकावून रंगत आणली. पण गिलचे शतक किंग कोहलीच्या शतकावर भारी पडले.
आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला एकदाही जेतेपद पटकावता आले नाही. आरसीबीसोबत यंदा देखील तेच झाले जे मागील १५ वर्षांपासून होत आले आहे. बंगळुरूच्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने ट्विटच्या माध्यमातून चाहत्यांची भावना मांडली.
पठाणने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "फक्त दोन शब्दात मागची १५ वर्षे उलटली, एक आशा आणि दुसरी इच्छा. RCB च्या चाहत्यांसाठी ट्रॉफीची प्रतीक्षा अद्याप सुरूच आहे." मागील १५ वर्षे आरसीबीच्या चाहत्यांसाठी 'जर तर'च्या गणितावर गेली असल्याचे इरफान पठाणने म्हटले.
RCB च्या पराभवानंतर 'शतकवीर' शुबमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
गिलचे शतक अन् आरसीबीचे आव्हान संपुष्टातगुजरातविरूद्धचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी 'करा किंवा मरा' असा होता. गतविजेत्यांना पराभूत करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचे आव्हान विराट आर्मीसमोर होते. पण गुजरातने आपला विजयरथ कायम ठेवून आरसीबीला बाहेरचा रस्ता दाखवला अन् मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. आरसीबीने दिलेल्या १९९ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने १०४ धावांची नाबाद शतकी खेळी करून गुजरातला विजय मिळवून दिला.