Shubman Gill कडे भारताचा सुपर स्टार म्हणून पाहिले जातेय... गेल्या वर्षभरात त्याने वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करून दाखवली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याच्याकडे चेतेश्वर पुजाराच्या तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी सोपवली गेली आहे. काहींच्या मते तो भविष्यात टीम इंडियाचा कर्णधारही बनू शकतो, परंतु भारताचा माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद याने शुबमनच्या कसोटी क्रिकेटमधील अलीकडच्या कामगिरीवर टीका केली. गिलची निवड कामगिरीच्या आधारावर झाली नसून पक्षपाताच्या आधारावर झाली आहे, असेही तो म्हणाला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिलची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि तो केवळ ६ धावा करून बाद झाला. अलीकडची कामगिरी पाहता गिलने आशियाबाहेर एकही प्रभावी कसोटी डाव खेळला नाही आणि त्यामुळेच त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. व्यंकटेश प्रसादने त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिले, “मला शुबमन गिलच्या प्रतिभेचा आणि क्षमतेबद्दल खूप आदर आहे, परंतु दुर्दैवाने त्याची कामगिरी अत्यंत वाईट आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० डावांनंतर ३०ची कसोटी सरासरी सामान्य आहे. मी अशा अनेक खेळाडूंचा विचार करू शकत नाही ज्यांना इतक्या संधी देण्यात आल्या आहेत.''