नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या मधल्या फळीतील एकेकाळचा भक्कम आधार आणि स्फोटक फलंदाज युवराज सिंगयानं निवृत्तीचे संकेत दिले आहेत. 2019 पर्यंत क्रिकेट खेळणार असून त्यानंतर निवृत्तीबाबत विचार करणार आहे, असं तो म्हणाला. युवराजने देशासाठी अखेरचा सामना जून 2017 मध्ये खेळला होता. आयपीएलचे पर्व माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असून, चांगल्या कामगिरीच्या बळावर 2019च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळू शकते, असा विश्वास त्याने व्यक्त केला. युवराज सिंग गेल्या 17 ते 18 वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो आहे. 2000मध्ये युवराजने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
युवराजने पंजाब किंग्ज इलेव्हन संघाबाबतही वक्तव्य केले. त्याने चांगली कामगिरी करुन लवकरात लवकर उपांत्य फेरी गाठण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच यावेळी ख्रिस गेलच्या फलंदाजीचेही युवराजने कौतुक केले. तसेच आयपीएल 2018 मध्ये पंजाबची खरी स्पर्धा चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सशी आहे, असेही त्याने सांगितले.