मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात सलामीला शुभमन गिलला संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर पृथ्वी शॉने दोन्ही डावांत निराशाजनक कामगिरी केल्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याचा पत्ता कट केला जाऊ शकतो. २६ डिसेंबरला सुरू होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याआधी बीसीसीआयने गिलचा नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना व्हिडिओ पोस्ट केला आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या डावात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपल्यामुळे यजमान संघाला विजयासाठी ९० धावांचे आव्हान मिळाले. दरम्यान, कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतल्यामुळे अजिंक्य रहाणे याने काळजीवाहू कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली.
गुलाबी चेंडूने झालेल्या सराव सामन्यात गिलने ४३ आणि ६५ धावा ठोकल्या होत्या. तरीही त्याला पहिल्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. दुसऱ्या सामन्याआधी गिलने मयांक अग्रवालसोबत सराव केल्यामुळे या सामन्यात दोघेही सलामीला खेळतील, असे संकेत मिळाले आहेत. पंजाबकडून रणजी करंडकात डावाला सुरुवात करणाऱ्या गिलला पृथ्वी शाॅच्या जागी संधी दिली जाईल. लोकेश राहुल यानेदेखील नेट्समध्ये वेळ घालवला.
सरावाच्या सुरुवातीला मुख्य कोच रवी शास्त्री यांनी सर्व खेळाडूंसोबत हितगुज साधले. बीसीसीआयने ट्विट करीत लिहिले, ‘आम्ही मेलबोर्नमध्ये आहोत. लाल चेंडूने कसोटी खेळण्याची तयारी सुरू झाली. ही सोबत तयारीची वेळ आहे. हॅश टॅग इंडिया...!’
रवी शास्त्री यांनी ऋषभ पंतसोबत चर्चा केली. पंत हा रिद्धिमान साहाच्या आधी फलंदाजीच्या सरावास आला होता. सराव सामन्यात ७३ आणि १०३ धावांचे योगदान देणाऱ्या पंतला साहाच्या जागी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मोहम्मद शमी मनगटाच्या दुखण्यामुळे मालिकेत खेळणार नाही. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर या वेगवान गोलंदाजांनी रहाणेपुढे मारा केला. फलंदाजी कोच विक्रम राठोड यांनीदेखील शॉ सोबत संवाद साधला.
जडेजा फिट
डोक्याला झालेल्या जखमेमुळे पहिल्या कसोटीस मुकलेल्या
रवींद्र जडेजाने देखील नेट्समध्ये फलंदाजी
आणि गोलंदाजी केली.
त्याने एक तास
चेतेश्वर
पुजारापुढे
गोलंदाजीचा
सराव केला.
वॉर्नर, एबोट दुसऱ्या कसोटीला खेळू शकणार नाहीत
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज सीन एबोट हे भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामनादेखील खेळू शकणार नाहीत. वॉर्नर आणि एबोट हे आपापल्या दुखापतीवर उपचारासाठी बायोबबलबाहेर होते. दोघेही शनिवारी मेलबोर्नमध्ये दाखल झाले. जैव सुरक्षा प्रोटोकॉलमुळे दोन्ही खेळाडू कसोटी संघासोबत राहू शकणार नाहीत, असे सीएने म्हटले आहे. दोघेही स्वतंत्र सराव सुरू ठेवतील. तिसऱ्या कसोटी सामन्याआधी मात्र ते संघात सहभागी होऊ शकतील.
Web Title: A sign that Shubhaman Gill will get a chance, Prithvi Shawla will get Dutch; India start training for the second Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.