लंडन, अॅशेस 2019 : क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी आहेत की, ज्या बऱ्याच चाहत्यांना माहिती नाही. आता 'Silver Duck' म्हणजे काय, हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. पण आज सुरु झालेल्या अॅशेस कसोटी मालिकेत ही गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर बाद झाला त्यानंतर 'Silver Duck' या शब्दाचा जास्त उल्लेख व्हायला लागला.
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. यावेळी फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला भोपळाही फोडता आला नाही. पण त्यानंतर पुन्हा एकदा स्टीव्हन स्मिथ संघासाठी धावून आला.
वॉर्नरला यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आऊट केले. आतापर्यंत वॉर्नरला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा पराक्रम यावेळी ब्रॉडने केला आहे. ब्रॉडने आतापर्यंत दहा वेळा वॉर्नरला कसोटी क्रिकेटमध्ये बाद केले, यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचाच वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर होता. अँडरसनने वॉर्नरला 9 वेळा बाद केले होते.
सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर वॉर्नर बाद झाला. जर वॉर्नर पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता तर त्याला गोल्डन डक, असे म्हटले असते. पण वॉर्नर दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यामुळे त्याला 'Silver Duck' असे म्हटले गेले.
अजब योगायोग! इंग्लंडच्या संघात सात खेळाडू शेम टू शेम...
अॅशेस मालिकेच्या निर्णयाक कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाकडून एक अजब योगायोग पाहायला मिळाला. हा योगायोग म्हणजे इंग्लंडच्या संघात सात खेळाडू शेम टू शेम आहेत. हे ऐकून तुम्ही थोडेसे चक्रावला असाल, पण हो खरंच असं घडलंय...
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी आणि त्यांनी आपला संघ जाहीर केला. त्यानंतर इंग्लंडने आपला संघ जाहीर केला. हा संघ जाहीर झाल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या. कारण त्यांना एक गोष्ट समजली होती. आणि ती गोष्ट म्हणजे या संघातील तब्बल सात खेळाडूंची नावे 'J' या इंग्रजी अक्षरावरून सुरु होतात. आता तुम्हालाही या गोष्टीचा विश्वास बसत नसेल.
इंग्लंडच्या संघात जो डेनली (Joe Denly), जो रूट (Joe Root), जेसन रॉय (Jason Roy), जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow), जोस बटलर (Jos Buttler), जोफ्रा आर्चर (Jofra Archer), जॅक लीच (Jack Leach), या सात खेळाडूंची नावे 'J' या इंग्रजी अक्षरावरून सुरु होताना दिसतात