सिडनी : गुरुवारपासून सिडनीत तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीताच्या वेळी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भावुक झाला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. सिराजचा हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सिराजचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही अधिकृत ट्विटरवर हा भावनिक क्षण पोस्ट केला. मोहम्मद कैफ आणि वासिम जाफरनेही ट्विट करीत सिराजला दाद दिली आहे. आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी थोडी गर्दी नसली तरी चालेल पण भारताकडून खेळण्यापेक्षा मोठी कोणतीही प्रेरणा नाही. एकदा मोठ्या दिग्गजाने म्हटल्याप्रमाणे, “तुम्ही गर्दीसाठी नाही, देशासाठी खेळत आहात.” असे ट्विट जाफरने केले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना मोहम्मद सिराजच्या वडिलांचे भारतात अल्प आजाराने निधन झाले. देशाकडून खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारा आधारवड हरपल्यामुळे सिराजवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. ‘त्यांना मला भारताकडून खेळताना पाहायचे होते. या दु:खातून सावरत भारतीय संघासोबत राहून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला,’ असे सिराजने खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
सिराजने पुकोव्हस्कीला काही बाऊन्सर टाकले. ते त्याने खेळून काढले. याविषयी विचारताच बाऊन्सर टाकून प्रतिस्पर्धी फलंदाजावर दडपण आणण्याची योजना होती, असे सिराजने सांगितले. ऋषभ पंतने दोनदा पुकोव्हस्कीचा झेल सोडला. यामुळे गोलंदाजांचा आत्मविश्वास डळमळीत होतो का, असे विचारताच सिराज म्हणाला,‘ हा खेळाचा भाग आहे. असे घडले की गोलंदाज या नात्याने निराशा येते पण काही करू शकत नाही. पुढच्या षटकावर लक्ष केंद्रित करणे इतकेच आपल्या हातात असते.’