Mohammad Siraj James Anderson, IND vs NZ: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील ३ सामन्यात ९ विकेट्स घेतल्या. त्यापैकी त्याने केवळ पॉवरप्लेमध्ये ७ विकेट घेतल्या. २०२२ च्या सुरुवातीपासून, सिराज हा पॉवर-प्लेमध्ये वन डे सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरताना दिसत आहे. नव्या चेंडूसह तो अधिक चांगली गोलंदाजी करत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत सिराजने गेल्या वर्षभरात असे काय केले आहे की ज्यामुळे त्याची गोलंदाजी इतकी मारक झाली आहे, असा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल. तर त्याचे उत्तर म्हणजे त्याने शिकलेले गोलंदाजीतील 'ब्रह्मास्त्र'. क्रिकेट विश्वात केवळ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन ज्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो, त्या प्रकारचा एक खास चेंडू सिराजने शिकला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
काय आहे हे बह्मास्त्र अन् काय आहे त्यामागचं गणित
या ब्रह्मास्त्राचे नाव आहे 'वॉबल सीम डिलिव्हरी'. वॉबल म्हणजे हवेत चेंडू हलणे. गोलंदाजीमध्ये, जेव्हा गोलंदाजाच्या हातून चेंडूत सुटल्यानंतर सीम स्थिर नसते तेव्हा हा शब्द वापरला जातो. चेंडू टप्पा पडेपर्यंत राहते. म्हणजेच ती डावी-उजवीकडे फिरत राहते. अशा वेळी चेंडू खेळपट्टीवर आदळण्यापर्यंत एका दिशेने स्थिर राहण्याऐवजी दोन्ही दिशेने फिरतो. त्यामुळे चेंडू आदळल्यानंतर चेंडू आत येणार की बाहेर जाणार याबाबत फलंदाज संभ्रमात राहतात.
सामान्यपणे, जेव्हा चेंडूची सीम फलंदाजाच्या दिशेने जात असते त्यावेळी एका दिशेने स्थिर राहते, त्यामुळे चेंडूत इनस्विंग की आऊटस्विंग याचा अंदाज बांधता येतो. परंतु वॉबल सीमच्या बाबतीत, जोपर्यंत चेंडू पिच होत नाही, तोपर्यंत हालचालीचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे फलंदाजाला चेंडू कळण्यास कमी वेळ मिळतो आणि शॉटच्या निवडीत चुका होण्याची शक्यता वाढते. या सोबतच गोलंदाजाला विकेट मिळण्याची शक्यताही वाढते.
सिराज स्वत: याबद्दल काय म्हणाला?
श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या वन डे सामन्यात सिराजने पॉवर-प्ले मध्येच ४ विकेट्स घेतल्या. सामन्यानंतर सिराज म्हणाला की, वॉबल सीम फलंदाजांना सहजासहजी समजत नाही. या चेंडूने, मी चेंडू योग्य ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतो आणि फलंदाजाला जास्तीत जास्त अडचणी निर्माण करतो. मी या चेंडूचा नेटमध्ये वॉबल सीमसह सराव करतो. चांगले नियंत्रण मिळाल्यावरच मी सामन्यात या चेंडूचा प्रयोग केले नि त्याचे आता मला चांगले परिणामही दिसू लागले.
हा चेंडू कसा टाकला जातो?
वॉबल सीम डिलिव्हरी सामान्यतः वेगवान गोलंदाजांद्वारे केली जाते. इन-स्विंग आणि आउट-स्विंग चेंडू टाकण्यासाठी, सीमवर बोटं ठेवली जातात. पण, वॉबल सीम बॉल टाकण्यासाठी दोन बोटांमधील अंतर वाढवावे लागते.
अँडरसनकडे आहे हे 'ब्रह्मास्त्र'
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने वॉबल सीम डिलिव्हरी लोकप्रिय केली असे मानले जाते. वयाच्या ४० व्या वर्षीही तो वॉबल सीम चेंडूच्या मदतीने अनेक युवा आणि अनुभवी फलंदाजांची डोकेदुखी वाढवताना दिसतो. अँडरसनने गेली १२ वर्षे या चेंडूचा वापर करून अनेक विकेट्स घेतल्या आहेत. सध्याच्या घडीला सर्वाधिक कसोटी बळी घेणारा तो वेगवान गोलंदाज आहे. त्याने इंग्लंडकडून १७७ कसोटीत ६७५ विकेट्स घेतल्या आहेत.