Join us  

सिराज, शमी, शार्दुल ऑस्ट्रेलियासाठी सज्ज; चहर पाठदुखीमुळे स्पर्धेबाहेर

बीसीसीआयने जेव्हा विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली, तेव्हा चहरचा समावेश राखीव खेळाडूंमध्ये होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 5:39 AM

Open in App

नवी दिल्ली : मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांसह ‘पालघर एक्स्प्रेस’ म्हणून ओळखला जाणारा अष्टपैलू शार्दुल ठाकूर आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. त्याच वेळी, वेगवान गोलंदाज दीपक चहर पाठदुखीमुळे त्रस्त असल्यामुळे तो टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

याआधी बीसीसीआयने जेव्हा विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली, तेव्हा चहरचा समावेश राखीव खेळाडूंमध्ये होता. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर चहरचा संघातील समावेश निश्चित मानला जात होता. परंतु, त्याला पाठदुखीतून पूर्णपणे सावरण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला माहिती दिली की, ‘दीपकला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागेल. त्याला पुन्हा पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. तो टाचेच्या दुखापतीतून सावरला आहे, पण आता पाठदुखी पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे बीसीसीआयने सिराज, शमी आणि शार्दुल यांना ऑस्ट्रेलियाला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.’

मोहम्मद शमी आघाडीवरसिराज, शमी आणि शार्दुल यांच्यापैकी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मोहम्मद शमी आपल्या अनुभवाच्या जोरावर सर्वात आघाडीवर आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावत सिराजने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याचप्रमाने, अष्टपैलू खेळ ही शार्दुलची ताकद आहे आणि या जोरावर तो शमी-सिराज यांना टक्कर देऊ शकतो. रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर यांची अद्याप ऑस्ट्रेलियाला जाण्याची शक्यता नसल्याचीही माहिती मिळाली आहे.

 नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेत चहरने सहभाग घेतला होता. मात्र, यानंतर पाठदुखीमुळे त्याला एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळता आली नव्हती. पाठदुखीच्या उपचारासाठी चहर आता बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) गेला आहे.  टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी बुमराहच्या जागी पर्यायी खेळाडूची घोषणा करण्यास बीसीसीआयकडे १५ ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे.  त्यामुळे या तिन्ही वेगवान गोलंदाजांची तंदुरुस्ती जाणून घेण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. तसेच, योग्य वेळी ऑस्ट्रेलियात पोहोचल्यास तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासही या खेळाडूंना मदत होईल. 

टॅग्स :मोहम्मद शामीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2
Open in App