नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डच्या अधिकाऱ्याने (बीसीसीआय) आरोप केला की, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला रविवारी तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या एका गटाने वर्णद्वेषी शेरेबाजी करताना ‘बाऊन डॉग’ आणि ‘बिग मंकी’ म्हटले. त्यानंतर ‘त्या’ प्रेक्षकांना स्टेडियमच्या बाहेर काढण्यात आले. सिराजचा संघातील सीनिअर सहकारी जसप्रीत बुमराह यालाही शनिवारी वर्णद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे लागले होते. त्याची तक्रार भारतीय संघव्यवस्थापनाने अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांच्याकडे केली होती.
रविवारी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ८६ व्या षटकादरम्यान सिराज सीमारेषेवरून स्केअरलेग पंचांकडे आला आणि त्यांच्यासोबत बोलत होता. त्यानंतर गोलंदाजी एंडवरील पंच व उर्वरित सीनियर खेळाडूही तेथे येऊन चर्चा करत होते. खेळ जवळजवळ १० मिनिटे थांबला. त्यानंतर स्टेडियममधील सुरक्षा रक्षक व न्यू साऊथ वेल्स पोलीस कर्मचारी गैरवर्तन करत असलेल्या प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये गेले. आजूबाजूच्यासोबत चर्चा केल्यानंतर पोलिसांनी सहा समर्थकांना स्टेडियमबाहेर काढले आणि आता ते न्यू साऊथ वेल्स पोलिसांच्या ताब्यात आहेत. शनिवारी भारतीय संघाने सामनाधिकाऱ्यांकडे गैरवर्तनाबाबत तक्रार केली होती, पण त्यावेळी ते प्रेक्षक स्टेडियममधून निघून गेले होते.
n बीसीसीआयच्या सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की,‘सिराजला ‘बाऊन डॉग’ आणि ‘बिग मंकी’ म्हटले.
nहे शब्द वर्णद्वेषी शेरेबाजीमध्ये येतात. पंचांना लगेच माहिती देण्यात आली. प्रेक्षक बुमराहविरुद्धही अपशब्दांचा वापर करत होते.