भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा गेल्या काही काळापासून जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याने आपल्या गोलंदाजीची भेदकता दाखवून दिली आहे. श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार कामगिरी केल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धही हाच फॉर्म कायम राखला आहे. तसेच पहिल्या दोन्ही सामन्यात भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने एक निर्धाव षटक टाकत मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. हा रेकॉर्ड नेमका काय आहे, ते आपण पाहुयात.
मोहम्मद सिराजने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत चार विकेट्स मिळवले होते. त्यानंतर काल झालेल्या दुसऱ्या एखदिवसीय सामन्यामध्येही त्याने तुफानी गोलंदाजी केली. सिराजने सहा षटकांमध्ये १० धावा देऊन एक बळी टिपला. त्यामध्ये सिराजने एक षटक निर्धाव टाकले. त्याबरोबरच मोहम्मद सिराज हा २०२२ पासून आतापर्यंत सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारा गोलंदाज ठरला आहे.
मोहम्मद सिराजने २०२२ पासून आतापर्यंत १७ निर्धाव षटके टाकली आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूडने १४ निर्धाव षटके टाकली आहेत. तर १० निर्धाव षटकांसह न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मोहम्मद सिराजने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांमध्ये दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहची उणीव भासू दिलेली नाही. सिराज २०२२ मध्ये भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला होता. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व केले आहे. त्याने भारताकडून आतापर्यंत २१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८ विकेट्स मिळवले होते.
मोहम्मद सिराज डावाच्या सुरुवातीला भेदक गोलंदाजी करतो. तसेच त्याचा मारा किफायतशीर असतो. जेव्हा जेव्हा संघाला विकेट्सची आवश्यकता असते, तेव्हा मोदम्मद सिराज विकेट्स मिळवून देतो, त्यामुळे अल्पावधीतच तो भारतीय संघातील आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक होता.