Join us  

सहा चेंडूत सहा फलंदाजांची उडवली दांडी! इंग्लंडच्या युवा क्रिकेटपटूची 'बोल्ड' कामगिरी

समोर खेळत असलेल्या फलंदाजांची दांडी उडवणे हे गोलंदाज आपल्यासाठी अभिमानास्पद मानत असतात. तसेच गोलंदाजाने टाकलेल्या भन्नाट चेंडूवर फलंदाजाचा त्रिफळा उडताना पाहणे प्रेक्षकांसाठीही एक पर्वणीच असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 7:34 AM

Open in App

 लंडन, दि. 12 -  समोर खेळत असलेल्या फलंदाजांची दांडी उडवणे हे गोलंदाज आपल्यासाठी अभिमानास्पद मानत असतात. तसेच गोलंदाजाने टाकलेल्या भन्नाट चेंडूवर फलंदाजाचा त्रिफळा उडताना पाहणे प्रेक्षकांसाठीही एक पर्वणीच असते. त्यामुळेच फलंदाजाला चकवून त्याची दांडी गुल करण्यासाठी गोलंदाज प्रयत्नशील असतात. त्यातच  काल इंग्लंडमधील एका ज्युनियर क्रिकेटपटूने  फलंदाजांची दांडी गुल करण्यामध्ये एक नवा विक्रम नोंदवला आहे. इंग्लंडमधील या गोलंदाजांना अशा विक्रम केला आहे. ज्याच्याबाबत वाचल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही. ल्युक रॉबिन्सन या गोलंदाजाने 13 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सलग सहा चेंडूवर सहा बळी टिपले आहेत. या विक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने सर्वच्या सर्व सहा फलंदाजांचा त्रिफळा उडवत एकाच षटकात डबल हॅटट्रिक साजरी केली. रॉबिन्सनच्या या कामगिरीच्या जोरावर त्याचा संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. रॉबिन्सन हा फिलाडेल्फिया क्लबकडून या सामन्यात सहभागी झाला होता. विशेष म्हणजे हा विक्रम घडताना त्याचे संपूर्ण कुटुंबीयही  मैदानात उपस्थित होते. रॉबिन्सनची आई सामन्याचे स्कोअरर म्हणून जबाबदारी निभावत होती.  तर वडील मैदानात पंच म्हणून काम पाहत होते. एवढंच नाही तर रॉबिन्सनचा धाकटा भाऊ मॅथ्थ्यू त्याच्याच संघातून खेळत होता आणि आजोबा प्रेक्षकांमध्ये बसून आपल्या नातवंडांचा खेळ पाहत होते. सामना संपल्यानंतर रॉबिन्सनच्या वडलांनी हा विक्रम म्हणजे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे असे सांगितल. रॉबिन्सनचे वडीलही गेल्या 30 वर्षांपासून क्रिकेट खेळत असून त्यांनीही क्रिकेटमध्ये हॅटट्रिक नोंदवण्याचा विक्रम केला होता.