यंदाचे वर्ष हे क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणीचं आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियात महिलांचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये पुरुषांची ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. क्रिकेटचा हा फिव्हर 2021मध्येही कायम राहणार असल्याची काळजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) घेतली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी 2021मध्येही वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्याचे सामने सहा विविध शहरांत होणार असल्याची घोषणा गुरुवारी आयसीसीनं केली.
न्यूझीलंडमध्ये हा वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. ऑकलंड येथील इडन पार्कवर वर्ल्ड कप स्पर्धेचा सलामीचा सामना होणार आहे. त्यानंतर वेलिंग्टन, हॅमिल्टन, टौरंगा, ड्युनेडीन आणि ख्राइस्टचर्च या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. 6 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत 31 सामने खेळवण्यात येतील आणि अंतिम सामना ख्राइस्टचर्च येथील हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर होईल. आता हा कोणता वर्ल्ड कप, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? 2021मध्ये न्यूझीलंड येथे महिलांचा वन डे वर्ल्ड कप होणार आहे आणि त्याच्या यजमान शहरांची आज घोषणा करण्यात आली.
आजच्या या घोषणेच्या वेळी भारताची माजी कर्णधार मिताली राज, न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हीनसह सुझी बेट्स व अॅमेली केर या किवी खेळाडूही होत्या. पुरुष क्रिकेटपटू टॉम लॅथम आणि हेन्री निकोल्स यांचीही यावेळी उपस्थिती होती. मितालीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी 2021मध्ये होणारा वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा तिचा निर्धार आहे. कदाचित तिचा हा अखेरचा वन डे वर्ल्ड कप असणार आहे.