ढाका - बांगलादेशचा मधल्या फळीतील फलंदाज सब्बीर रहमानवर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सब्बीर रहमान राष्ट्रीय संघासोबत स्थानिक क्रिकेटही खेळू शकणार नाहीये. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) सब्बीर रहमानला 20 लाख टका म्हणजेच 24 हजार डॉलर दंड ठोठावला आहे. यासोबतच 2018 मध्ये खेळण्यासाठी करण्यात आलेले सर्व करार रद्द करण्यात आले आहेत. 21 डिसेंबरला प्रथम श्रेणी राष्ट्रीय क्रिकेट लीगच्या सामन्यादरम्यान सब्बीर रहमानने 12 वर्षाच्या चाहत्याला मारहाण केली होती. मारहाण करण्यामागचं कारण फक्त एवढंच होतं की, तो चाहता सब्बीर रहमानचं नाव घेऊन जोरजोरात ओरडत होता.
राजशाही डिव्हिजन नॅशनल क्रिकेट लीग आणि ढाका मेट्रोपोलिसदरम्यान एक सामना खेळला जात होता. सामना संपल्यानंतर एका चाहत्याने सब्बीरला टोमणे मारण्यास सुरुवात केली. यामुळे सब्बीर रहमनान चिडला आणि त्याने साइटस्क्रीनच्या मागे जाऊन चाहत्याला जबरदस्त मारहाण केली.
इतकंच नाही जेव्हा अम्पायरने समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा सब्बीरने त्यांच्याशीही वाद घालण्यास सुरुवात केली. बांगलादेशमधील राजशाही शहरात हा सामना सुरु होता. बांगलादेश क्रिकेट बोर्ड नववर्षाला याप्रकरणी निर्णय घेणार होता. नववर्षाच्या सुरुवातीलाच आपल्यासाठी शिस्त अत्यंत महत्वाची असल्याचा संदेश खेळाडूंपर्यंत गेला पाहिजे असं बांगलादेश क्रिकेट बोर्डाचं म्हणणं होतं. त्यानुसार सब्बीर रहमानवर सहा महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
बोर्डाच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडू कितीही मोठा असला तरी सर्वांना समान वागणूक देण्यात येईल. चूक झाली असल्यास शिक्षेसाठी सर्वजण एकच पातळीवर आहेत. सब्बीर रहमान आता पुढील सहा महिने संघाचा भाग नसणार आहे. सब्बीर रहमानला याआधीही अनेकदा आपल्या वागणुकीसाठी कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.