नवी दिल्ली : आक्रमकतेच्या जोरावर जगभरातील टी-२० लीगमध्ये विशेष स्थान निर्माण करणाऱ्या ख्रिस गेलला आयपीएलदरम्यान एक हजार षटकार ठोकणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा विक्रम नोंदविण्याची संधी आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक ३२६ षटकार ठोकणाºया गेलने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ९७८ षटकार लगावले आहेत. त्याला १ हजार षटकारांचा विक्रम नोंदवण्यासाठी २२ षटकारांची गरज आहे. गेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये ११ स्पर्धा खेळल्या आहेत. त्यात सहावेळा त्याने २२ पेक्षा अधिक षटकार ठोकले आहेत. टी-२० मध्ये सर्वाधिक चौकार (१०२६) लगावण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे.
गेल वैयक्तिक कारणांमुळे कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेला नाही, पण आयपीएलमध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहे. गेलनंतर एबी डिव्हिलियर्स (२१२) आणि महेंद्रसिंग धोनी (२०९) यांचा क्रमांक येतो. टी-२० मध्ये सर्वाधिक धावा (१३,२९६), सर्वाधिक शतके (२२), अर्धशतके (८२), वैयक्तिक धावसंख्या (नाबाद १७५) सर्वांत जलद शतक (३० चेंडू), पराभूत संघातर्फे सर्वाधिक धावा (नाबाद १५१), वर्षांत सर्वाधिक धावा (२०१५ मध्ये १,६६५), सर्वाधिक सामनावीर (५८), डावात सर्वाधिक चौकार-षटकाराने धावा (१५४ विरुद्ध पुणे वॉरिअर्स) हे सर्व विक्रम गेलच्या नावावर आहे. गेल टी-२० मध्ये २७ वेळा खाते न उघडता बाद झाला आहे.
गेल्या वर्षी या संघाकडून त्याने ३४ षटकार आणि २०१८ मध्ये २७ षटकार लगावले होते. गेलने २०११ (४४ षटकार), २०१२ (५९), २०१३ (५१) आणि २०१५ (३८) या पर्वांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूतर्फे खेळताना हा विक्रम नोंदवला. २१ सप्टेंबर रोजी त्याचा ४१ वा वाढदिवस आहे.