Join us  

SL vs AFG: अफगाणिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात! श्रीलंकेच्या विजयाने ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत मोठी वाढ, वाचा सविस्तर

टी-20 विश्वचषकात आज श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 1:45 PM

Open in App

ब्रिस्बेन : टी-20 विश्वचषकात आज श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL vs AFG) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात आशियाई किंग्ज श्रीलंकेने एकतर्फी विजय मिळवल्याने श्रीलंकेच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खरं तर श्रीलंकेच्या या विजयामुळे यजमान ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण श्रीलंका सध्या 4 गुणांसह क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलियाचा संघ 5 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर स्थित आहे. श्रीलंकेने मंगळवारी ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये वानिंदू हसरंगाची उत्कृष्ट गोलंदाजी आणि धनंजया डी सिल्वाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सामना जिंकला. अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरीकडे कूच केली. 

तत्पुर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अफगाणिस्तानच्या कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अफगाणिस्तानकडून सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. तर उस्मान घनी (27), इब्राहिम झद्रान (22), नझधीबुल्लाह जादरान (18), मोहम्मद नबी (13), राशिद खान (9), आणि मुजीब उर रहमान (1) धाव करून तंबूत परतला. श्रीलंकेकडून वानिदू हसरंगाने सर्वाधिक 3 बळी पटकावले, तर लहिरू कुमारा याने 2 बळी घेतले. याशिवाय कसुन रजिथा आणि धनंजय डी सिल्वा यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. 

धनंजय डी सिल्वाची अष्टपैलू खेळीअफगाणिस्तानने 20 षटकांत 8 बाद 144 एवढ्या धावा केल्या होत्या. 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात निराशाजनक झाली होती. सलामीवीर पथुम निसंका (10) आणि कुसल मेंडिस (25) धावांवर तंबूत परतले. त्यानंतर धनंजय डी सिल्वाने 66 धावांची नाबाद खेळी करून श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. श्रीलंकेने 18.3 षटकांत 4 बाद 148 धावा केल्या. धनंजय डी सिल्वाच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 6 गडी राखून विजय मिळवला.

श्रीलंकेच्या विजयाने ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढश्रीलंकेच्या विजयामुळे अफगाणिस्तान विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. श्रीलंकेच्या विजयामुळे ग्रुप ए च्या क्रमवारीत मोठे फेरबदल झाले आहेत. आशियाई किंग्ज श्रीलंकेने यजमान संघाला धक्का दिला आहे. खरं तर ग्रुप ए मधून न्यूझीलंडच्या संघाने जवळपास उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात चुरस होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे सध्या 4 सामन्यांमध्ये 5 गुण आहेत, तर श्रीलंकेचे 4 सामन्यांमध्ये 4 गुण आहेत. इंग्लंडचा संघ 3 सामन्यांमध्ये 3 गुणांसह चौथ्या स्थानावर स्थित आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा आगामी सामन्यात पराभव झाला आणि श्रीलंकेने त्यांच्या पुढच्या सामन्यात विजय मिळवला तर श्रीलंका 6 गुणांसह दुसऱ्या स्थानी जाईल. मात्र इंग्लिश संघाचे अजून 2 सामने उरले आहेत, त्यामुळे त्यांची खेळी निर्णायक ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाचा पुढचा सामना 4 तारखेला अफगाणिस्तानसोबत होणार आहे, तर श्रीलंकेचा पुढचा सामना 5 तारखेला इंग्लंडसोबत होणार आहे. 

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२अफगाणिस्तानश्रीलंकाआॅस्ट्रेलियाइंग्लंड
Open in App