Sri Lanka vs Australia 4th ODI : श्रीलंकेने चौथ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली.. 0-1 अशा पिछाडीवरून यजमान श्रीलंकेने सलग तीन सामने जिंकले. 259 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया सर्वबाद 254 धावा करू शकले. 30 वर्षांनंतर श्रीलंकेने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला वन डे मालिकेत पराभूत केले. चरिथा असलंका (110 ) आणि धनंजया सिल्व्हा (60 )यांच्या शतकी भागीदारीने श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. डेव्हिड वॉर्नरच्या ९९ धावा व्यर्थ ठरल्या.
निरोशान डिकवेला ( १), पथूम निसंका ( १३) व कुसल मेंडिस ( १४) हे आघाडीचे तीनही फलंदाज झटपट माघारी परतल्यनंतर चरिथ असलंका व धनंजया डी सिल्वा यांनी श्रीलंकेच्या डावाला आकार दिला. ३ बाद ३४ अशा धावसंख्येवरून दोघांनी श्रीलंकेला ४ बाद १३५ धावांपर्यंत नेले. ६१ चेंडूंत ७ चौकारांसह ६० धावा करणाऱ्या धनंजयाचा अफलातून झेल ग्लेन मॅक्सवेलने टिपला अन् सामना पुन्हा फिरला. त्यानंतर चरिथ वगळता अन्य फलंदाज ऑसी गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. चरिथने १०६ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ११० धावा केल्या. वनिंदू हसरंगाने नाबाद २१ धावांचे योगदान दिले आणि श्रीलंकेने २५८ धावांपर्यंत मजल मारली. मॅथ्यू कुह्नेमन, पॅट कमिन्स व मिचेल मार्श यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात, कर्णधार आऱोन फिंच भोपळ्यावर माघारी परतला. मिचेल मार्श ( 26), मार्नस लाबुशेन ( 16), अॅलक्स केरी ( 19) व ट्रॅव्हीस हेड ( 27) हे अपयशी ठरले. डेव्हिड वॉर्नर एकाकी खिंड लढवत होता. त्याने 112 चेंडूंत 12 चौकारांसह 99 धावा केल्या. 5 बाद 189 अशा सुस्थितीत असूनही ऑस्ट्रेलियाची गाडी घसरली. ग्लेन मॅक्सवेल 1 धावेवर बाद झाला, त्यापाठोपाठ वॉर्नरही परतला अन् बघता बघता ऑस्ट्रेलियाचे 5 फलंदाज 65 धावांत माघारी परतले. चमिका करुणारत्ने, धनंजया डी सिल्व्हा व जेफ्रेय वंदेरसन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स ( 35) खेळपट्टीवर असेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या हातात सामना होता, परंतु 49 व्या षटकात त्याची विकेट पडली अन् श्रीलंकेने 4 धावांनी बाजी मारली. 1992 नंतर श्रीलंकेने घरच्या मैदानावर प्रथमच ऑस्ट्रेलियाला पराभूत केले.
Web Title: SL vs AUS : History: Sri Lanka won the Bilateral ODI series against Australia for the first time after 30 long years at home
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.