ICC ODI World Cup 2023 SL vs AUS Live : श्रीलंकेच्या सलामीवीरांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियाची धुलाई केली आहे. पथूम निसंका आणि कुसल परेरा यांनी १२४ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला रडकुंडीला आणले. पण, पॅट कमिन्सने संघाला कमबॅक करून दिले. डेव्हीड वॉर्नरने अफलातून झेल घेतला.
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी काही खास होताना दिसत नाही. सलग दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आज श्रीलंकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीवीर पथूम निसंका आणि कुसल परेरा यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करून पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रतिस्पर्धी संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावण्याची ही पाचवी वेळ आहे. १९९२ ( ग्रॅहम गूच व इयान बॉथम), २००७ ग्रॅमी स्थिथ व एबी डिव्हिलियर्स, २०१९ ( रोहित शर्मा व शिखर धवन) आणि २०१९ ( डी करुणारत्ने व कुसल परेरा) मध्ये असा पराक्रम झाला होता.
वर्ल्ड कप स्पर्धेतील मागील पाच वन डे सामन्यांत प्रतिस्पर्धी सलामीवीरांची चांगली कामगिरी ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटा घेऊन येणारी ठरली आहे. मागील सामन्यात टेम्बा बवुमा आणि क्विंटन डी कॉक यांनी १०८ धावांची सलामी दिली होती आणि ती मॅच ऑस्ट्रेलिया हरले होते. आज परेरा व निसंका यांनी १२५ धावांची भागीदारी केली. पॅट कमिन्सने २२ व्या षटकात श्रीलंकेला पहिला धक्का दिला. निसंका ६७ चेंडूंत ६१ धावांवर बाद झाला. ५ षटकानंतर परेराही ७८ ( ८२ चेंडू, १२ चौकार) धावांवर कमिन्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.