Join us  

Steven Smith : दीड वर्षानंतर पहिले कसोटी शतक झळकावले, तरीही स्टीव्ह स्मिथने विक्रम मोडले; Virat Kohli ला मागे टाकले

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट ( Joe Root) शतकांमागून शतक झळकावताना १७ वरून थेट २८ कसोटी शतकांपर्यंत पोहोचला तरी विराट कोहली ( Virat Kohli) २७ शतकांवरच अडकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 5:38 PM

Open in App

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट ( Joe Root) शतकांमागून शतक झळकावताना १७ वरून थेट २८ कसोटी शतकांपर्यंत पोहोचला तरी विराट कोहली ( Virat Kohli) २७ शतकांवरच अडकला आहे. त्यात आज ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत शतकी खेळी करून दीड वर्षांचा कसोटी शतकाचा दुष्काळ संपवताना विराटला मागे टाकले. स्मिथ (  १०९*) व मार्नस लाबुशेन ( १०४)  यांनी दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवताना संघाला ५ बाद २९८ धावांचा टप्पा गाठून दिला. स्मिथसह लाबुशेन यानेही परदेशातील पहिले कसोटी शतक झळकावले. स्मिथचे हे एकूण २८ वे शतक ठरले आणि त्याने जो रूटला मागे सोडले.  स्मिथने १५३ डावांमध्ये ही कामगिरी केली, तर रुटला २२४ डाव खेळावे लागले. स्मिथच्या २८ मधील १४ शतकं ही परदेशात आली आहेत आणि त्याने ७४ डावांत ५७.८६च्या सरासरीने ही शतकं झळकावली आहेत.  ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये स्मिथने माजी कर्णधार मायकेल क्लार्क याच्याशी बरोबरी केली आहे. रिकी पाँटिंग ( ४१), स्टीव्ह वॉ ( ३२), मॅथ्यू हेडन ( ३०), डॉन ब्रॅडमन ( २९) हे आघाडीवर आहेत.  परदेशात  सर्वाधिक कसोटी शतक झळकावणाऱ्या ऑसी फलंदाजांमध्ये पाँटिंग ( १६) व स्टीव्ह वॉ ( १६) हे आघाडीवर आहेत, त्यांच्यानंतर अॅलेन बॉर्डर ( १४) व स्मिथ ( १४) यांचा क्रमांक येतो.  

सध्या खेळत असलेल्या फलंदाजांमध्ये स्मिथ व रुट प्रत्येकी २८ शतकांसह आघाडीवर आहेत. त्यानंतर विराट कोहली ( २७), केन विलियम्सन ( २४)  व डेव्हिड वॉर्नर ( २४) यांचा क्रमांक येतो. सर्वात कमी डावांमध्ये २८ शतकं करणाऱ्या फलंदाजांत स्मिथने आता चौथे स्थान पटकावले आहे. विराटला या विक्रमात सचिन तेंडुलकरला मागे टाकून दुसरे स्थान पटकावण्याची संधी होती. पण, १४१ डावानंतर २७ शतकांवर अडकलेली त्याची गाडी १७३ डाव झाले तरी तिथेच आहे. सर डॉन ब्रॅडमन यांनी ७२ डावांत २८ शतकं झळकावली. या विक्रमासाठी तेंडुलकर १४४ डाव व स्मिथ १५३ डाव खेळले.    

टॅग्स :स्टीव्हन स्मिथविराट कोहलीनोकरीआॅस्ट्रेलियाश्रीलंका
Open in App