Join us  

श्रीलंकेने पहिला सामना जिंकला, पण बांगलादेशने माफक लक्ष्यासाठी त्यांना झुंजवले

SL vs BAN Asia Cup 2023 Live Marathi : बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या १६५ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना श्रीलंकेला चांगलाच घाम गाळावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 9:50 PM

Open in App

SL vs BAN Asia Cup 2023 Marathi Live Update : श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेतील सुरुवात विजयाने केली. बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या १६५ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना श्रीलंकेला चांगलाच घाम गाळावा लागला. पण, चरिथ असलंका ( ६२*) आणि सदीरा समराविक्रमा ( ५४ ) यांच्या ७८ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीने बांगलादेशच्या हातून सामना खेचून नेला. चरिथ व सदीरा यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. त्याआधी महिश थिक्षना ( २-१९) आणि मथिशा पथिराणा ( ४-३२) यांनी उत्तम गोलंदाजी करून बांगलादेशला बॅकफूटवर फेकले होते.

बांगलादेशचे फलंदाज गोंधळले! दोघंही एकाच एंडला पोहोचले, पण नेमकं OUT कोण हेच नाही समजले

श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर १५ धावांवर माघारी परतले. तस्कीन अहमद व शॉरिफुल इस्लाम यांनी अनुक्रमे पथुम निसंका ( १४) व दिमुथ खरुणारत्ने ( १) यांना माघारी पाठवले. त्यानंतर शाकिब अल हसनच्या अप्रतिम चेंडूवर कुसल मेंडिसचा ( ५) त्रिफळा उडाला अन् श्रीलंकेला ४३ धावांवर तिसरा धक्का बसला. शाकिब, मेहिदी हसन मिराज व महेदी हसन यांच्या माऱ्याने श्रीलंकेच्या फलंदाजांचं टेंशन वाढवलेलं होतं. चरिथ असलंका आणि सदीरा समराविक्रमा यांच्या संयमाची कसोटी होती आणि ते त्यावर खरे उतरले. दोघांनी संयमी खेळ करून बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगले उत्तर दिले. सेट झाल्यानंतर दोघांनी हात मोकळे करून अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. सदीराने ५९ चेंडूंत त्याचे अर्धशतक झळकावले. 

२७.२ षटकानंतर श्रीलंकेच्या ३ बाद ११८ धावा झाल्या आणि याच परिस्थितीत बांगलादेशच्या ४ बाद ११५ धावा होत्या. त्यामुळे सामन्यातील चुरस अजूनही कायम होती. विजयासाठी ४४ धावांची गरज असताना ही भागीदारी तुटली. सदीरा ( ५४) पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात महेदी हसनच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला.  त्याने चरिथसह चौथ्या विकेटसाठी ११९ चेंडूंत ७८ धावांची भागीदारी केली. शाकिबने श्रीलंकेच्या धनंजया डी सिल्वाचा ( २) त्रिफळा उडवून सामन्यातील चुरस वाढवली. पण, चरिथ एका बाजूने खिंड लढवत होता आणि त्याने ८५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ३८व्या षटकात श्रीलंकेच्या डावातील पहिला षटकार आला. चरिथ ९२ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ६२ धावांवर, तर दासून शनाका १४ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेने ३९ षटकांत ५ बाद १६५ धावा करून विजय मिळवला.

तत्पूर्वी, नजमुल होसैन शांतो ( Najmul Hossain Shanto) याने एकट्याने बांगलादेशचा किल्ला लढवला. महिश थिक्षना आणि मथिशा पथिराणा यांनी बांगलादेशचे कंबरडे मोडले. ६ बाद १६२ वरून बांगलादेश १६४ धावांवर ऑल आऊट झाले. शांतोने १२२ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या.  थिक्षानाने ८-१-१९-२ अशी स्पेल टाकली, तर पथिराणाने ७.४-०-३२-४ अशी सर्वोत्तम गोलंदाजी केली. श्रीलंकेकडून वन डे क्रिकेटमध्ये ४ विकेट्स घेणारा पथिराणा हा तरुण गोलंदाज ठरला. त्याने २० वर्ष व २५६ दिवसांचा असताना आज हा पराक्रम केला अन् महान गोलंदाज चमिंडा वास याचा ( २० वर्ष व २८० दिवस) १९९४ साली झिम्बाब्वेविरुद्ध नोंदवलेला विक्रम मोडला.  

 

टॅग्स :एशिया कप 2023श्रीलंकाबांगलादेश
Open in App