SL vs IND 1st ODI Upates : श्रीलंकेला सहज नमवून भारतीय संघ वन डे मालिकेत विजयी सलामी देईल असे सर्वांना वाटत होते. पण, सामन्याच्या अखेरीस सर्वकाही बदलले. भारताला १४ चेंडूत विजयासाठी एक धाव हवी होती. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांच्यावर विजयाची जबाबदारी होती. पण, अर्शदीप सिंगने एक चूक केली आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्यामुळे सामना अनिर्णित संपला. श्रीलंकेने दिलेल्या २३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार खेळी केली. रोहितने त्याचे आवडते शॉट्स खेळून श्रीलंकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. हिटमॅनने ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४७ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. पण, भारताला विजय साकारता आला नाही आणि यजमानांनी सामना अनिर्णित केला.
श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल या जोडीने भागीदारी करून डाव सावरला. मात्र, त्यांनाही अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकता आले नाही. अखेर टीम इंडिया ४७.५ षटकांत २३० धावांवर सर्वबाद झाल्याने सामना अनिर्णित झाला. भारताला विजयासाठी एक धाव हवी असताना अर्शदीप सिंग मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाल्याने भारताच्या तोंडचा घास गेला.
रोहित शर्माची नाराजी
सामना अनिर्णित संपल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, लक्ष्यापर्यंत सहज पोहोचता आले असते. पण, यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करावीच लागेल. आम्ही चांगली फलंदाजी केली पण ती लय कायम राखता आली नाही. आम्ही चांगली सुरुवात केली होती. फिरकीपटू गोलंदाजीला येताच सामना वेगळ्या वळणावर जाईल याची खात्री होती. काही खेळाडू स्वस्तात बाद झाल्याने सामना हातून निसटला. अक्षर पटेल आणि लोकेश राहुल यांच्या भागीदारीमुळे सामन्यात पुनरागमन करता आले. पण, त्यानंतर संतुलन बिघडले. १४ चेंडूत १ धाव करता न आल्याने नाराज आहे.
भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक (५८) धावा केल्या, तर शुबमन गिल (१६), विराट कोहली (२४), वॉशिंग्टन सुंदर (५), श्रेयस अय्यर (२३), लोकेश राहुल (३१), अक्षर पटेल (३३), शिवम दुबे (२५), कुलदीप यादव (२), मोहम्मद सिराज (५) आणि अर्शदीप सिंग खातेही न उघडता तंबूत परतला. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि कर्णधार चरिथ असलंका यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले, तर डुनिथ वेललेज (२), असिथा फर्नांडो आणि अकिला धनंजया यांना १-१ बळी घेण्यात यश आले.