Join us  

SL vs IND : "अर्शदीपनं हे काय केलं?", चाहत्यांचा संताप; भारत विजयापासून एक पाऊल दूर राहिला

SL vs IND 1st ODI Match : अर्शदीप सिंग बाद झाल्याने भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना अनिर्णित संपला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 10:15 PM

Open in App

SL vs IND 1st ODI Match Live Macth Updates In Marathi | कोलंबो : भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची एक चूक भारताला चांगलीच महागात पडली. विजयासाठी अवघी एक धाव हवी असताना त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला अन् तो बाद झाला. अर्शदीप बाद होताच भारत विजयापासून एक पाऊल दूर राहिला. पहिल्या वन डे सामन्यात भारतीय संघ सहज विजय मिळवेल असे अपेक्षित असताना यजमान श्रीलंकेने पाहुण्या टीम इंडियाला चांगलाच संघर्ष करण्यास भाग पाडले. कर्णधार रोहित शर्माने स्फोटक खेळी करताना श्रीलंकेवर दबाव टाकला. पण, रोहित बाद होताच यजमानांनी पुनरागमन केले.

श्रीलंकेने दिलेल्या २३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार खेळी केली. रोहितने त्याचे आवडते शॉट्स खेळून श्रीलंकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. हिटमॅनने ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४७ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. पण, भारताला विजय साकारता आला नाही आणि यजमानांनी सामना अनिर्णित केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वन डे मालिका कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवली जात आहे. 

श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल या जोडीने भागीदारी करून डाव सावरला. मात्र, त्यांनाही अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकता आले नाही. अखेर टीम इंडिया ४७.५ षटकांत २३० धावांवर सर्वबाद झाल्याने सामना अनिर्णित झाला. भारताला विजयासाठी एक धाव हवी असताना अर्शदीप सिंग मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाल्याने भारताच्या तोंडचा घास गेला. अर्शदीपच्या खराब शॉटचा दाखला देत चाहते संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर भन्नाट मीम्सही व्हायरल होत आहेत.

भारतीय फलंदाज अपयशी 

भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक (५८) धावा केल्या, तर शुबमन गिल (१६), विराट कोहली (२४), वॉशिंग्टन सुंदर (५), श्रेयस अय्यर (२३), लोकेश राहुल (३१), अक्षर पटेल (३३), शिवम दुबे (२५), कुलदीप यादव (२), मोहम्मद सिराज (५) आणि अर्शदीप सिंग खातेही न उघडता तंबूत परतला. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि कर्णधार चरिथ असलंका यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले, तर डुनिथ वेललेज (२), असिथा फर्नांडो आणि अकिला धनंजया यांना १-१ बळी घेण्यात यश आले.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाअर्शदीप सिंगभारतीय क्रिकेट संघ