SL vs IND 1st T20 Match Score Live Updates In Marathi | पल्लेकले : भारताने दिलेल्या २१४ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान श्रीलंकेने चांगली सुरुवात केली. सलामीवीर पथुम निसांका आणि कुसल मेंडिस या जोडीने भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्यांनी पहिल्या गड्यासाठी ८४ धावांची भागीदारी नोंदवली. श्रीलंकेचा खेळ असाच सुरू राहिल्यास भारत सहज पराभूत होईल असे वाटत असताना टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केले. अर्शदीप सिंगने मेडिंसला (४५) बाद करून भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला. मग अक्षर पटेल आणि अखेरीस रियान परागने कमाल करून भारताला विजय मिळवून दिला. श्रीलंकेचा संघ निर्धारित २० षटकेही खेळू शकला नाही आणि १९.२ षटकांत अवघ्या १७० धावांत गारद झाला. टीम इंडियाने ४३ धावांनी विजय नोंदवत विजयी सलामी दिली.
श्रीलंका मजबूत स्थितीत असताना अक्षर पटेलने घातक निसांका आणि कुसल परेरा यांना बाद करून सामन्यात रंगत आणली. पथुम निसांका (७९) आणि मेंडिस बाद झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी मजबूत पकड बनवली. निसांकाने ४ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४८ चेंडूत ७९ धावा कुटल्या. कर्णधार सूर्याने रियान परागला सतरावे षटक दिले. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत त्याने कामिंदू मेडिंसला बाहेरचा रस्ता दाखवला.
यजमान संघाकडून पथुम निसांकाने सर्वाधिक (७९) धावा केल्या, तर कुसल मेडिंस (४५), कुसल परेरा (२०), कामिंदू मेंडिस (१२), चरिथ असलंका (०), दासुन शनाका (०), वानिंदू हसरंगा (०), महेश तीक्ष्णा (२), मथीशा पथिराना (६), असीथा फर्नांडो नाबाद (०) आणि दिलशान मदुशंका खातेही न उघडता तंबूत परतला. भारताकडून रियान परागने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर अर्शदीप सिंग (२), अक्षर पटेल (२), मोहम्मद सिराज (१) आणि रवी बिश्नोईने (१) बळी घेतला. रियान परागने १.२ षटकांत ५ धावा देत ३ बळी घेतले.
तत्पुर्वी, भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांनी स्फोटक खेळी केली. सूर्याने अर्धशतकी खेळी करून भारताची धावसंख्या २०० पार पोहोचवली. त्याने २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने २६ चेंडूत ५८ धावांची स्फोटक खेळी केली. याशिवाय रिषभ पंतने १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ३३ चेंडूत ४९ धावा कुटल्या. भारताकडून यशस्वी जैस्वाल (४०), शुबमन गिल (३४), सूर्यकुमार यादव (५८), रिषभ पंत (४९), हार्दिक पांड्या (९), रियान पराग (७), रिंकू सिंग (१), अक्षर पटेल (नाबाद १०) आणि अर्शदीप सिंगने नाबाद १ धाव केली. अखेर भारतीय संघ निर्धारित २० षटकांत ७ बाद २१३ धावा करू शकला. भारतीय गोलंदाजांना रोखण्यात श्रीलंकेकडून मथीशा पथिरानाने मोठे योगदान देताना सर्वाधिक चार बळी घेतले, तर दिलशान मदुशंका, असीथा फर्नांडो आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
भारताचा संघ -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रियान पराग, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ -
चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कांमिदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महीश थीक्ष्णा, मथीशा पथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.
Web Title: SL vs IND 1st T20 Match Score Live Updates In Marathi Team India beat Sri Lanka by 43 runs, Riyan Parag took three wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.