SL vs IND 2nd T20 Live । पल्लेकले : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान श्रीलंकेची फलंदाजी कोलमडली. पण, पथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी शानदार खेळी करून सन्मानजनक धावसंख्या उभारली. भारतीय गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करत यजमान संघाला १६१ धावांत रोखले. श्रीलंकेने निर्धारित २० षटकांत ९ बाद १६१ धावा करून भारतासमोर विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य ठेवले. पल्लेकले येथील आंतरराष्ट्रीय मैदानात दुसरा ट्वेंटी-२० सामना होत आहे. हार्दिक पांड्याने घातक वाटणाऱ्या परेराला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच षटकात त्याने कामिंदू मेडिंसलाही बाद केले.
श्रीलंकेकडून कुसल परेराने सर्वाधिक धावा केल्या, त्याने २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ३४ चेंडूत ५३ धावा कुटल्या. त्याच्याशिवाय सलामीवीर पथुम निसांकाने (३२) धावांची खेळी केली. भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग या त्रिकुटाने प्रत्येकी २-२ बळी घेतले. श्रीलंकेच्या फलंदाजांनी डावाची सुरुवात चांगली केली होती. पहिल्या १५ षटकांत त्यांची धावसंख्या २ बाद १३० अशी होती. मात्र, अखेरच्या पाच षटकांत टीम इंडियाने पुनरागमन केले. भारताने अवघ्या ३१ धावा देत सात शेवटच्या पाच षटकांमध्ये बळी घेऊन श्रीलंकेच्या फलंदाजीची कंबर मोडली.
आज होत असलेला दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. एकूणच यजमान श्रीलंकेसाठी आजचा सामना म्हणजे 'करा किंवा मरा' असाच काहीसा आहे. कारण आजचा सामना श्रीलंकेने गमावल्यास त्यांचे मालिकेतील आव्हान संपुष्टात येईल. दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत ३० ट्वेंटी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने २० सामने जिंकले, तर श्रीलंकेला फक्त ९वेळा विजय मिळवता आला आहे.
भारताचा संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रियान पराग, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ -चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश थीक्ष्णा, मथीशा पथिराना, असिथा फर्नांडो.