SL vs IND 2nd T20 Live । पल्लेकले : दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात यजमान श्रीलंकेने दिलेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय सलामीवीरांना पहिल्याच षटकात तंबूत परतावे लागले. पहिल्या षटकातील ३ चेंडू (भारताच्या धावा ६) होताच पावसाचे आगमन झाले अन् एकच धावाधाव झाली. दोन्हीही संघाचे खेळाडू पॅव्हेलियनच्या दिशेने परतले. बराच वेळ पाऊस न थांबल्याने अखेर केवळ ८ षटकांचा सामना खेळवण्यात आला. भारताला ४८ चेंडूत विजयासाठी ७८ धावांची आवश्यकता होती. पाऊस थांबल्यावर खेळ सुरू होताच संजू सॅमसन महीश थीक्ष्णाच्या गोलंदाजीवर गोल्डन डक बाद झाला. मग यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पल्लेकले येथील आंतरराष्ट्रीय मैदानात पार पडला. अखेर भारताने सात गडी आणि ९ चेंडू राखून मालिका खिशात घातली.
यशस्वीने स्फोटक खेळी करून विजयाच्या दिशेने कूच केली. अखेरच्या ४ षटकांत टीम इंडियाला मालिका खिशात घालण्यासाठी ३३ धावांची गरज होती. यशस्वी जैस्वाल २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने १५ चेंडूत ३० धावा करून बाद झाला. त्याच्या स्फोटक खेळीला वानिंदू हसरंगाने ब्रेक लावला. तर सूर्यकुमार यादव (२६) मथीशा पथिरानाचा शिकार झाला. अखेर हार्दिक पांड्याने फिनिशिंग टच देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताने ६.३ षटकांत ३ बाद ८१ धावा करून विजय साकारला. हार्दिक पांड्याने १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ९ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या. श्रीलंकेकडून महीश थीक्ष्णा, मथीशा पथिराना आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
तत्पुर्वी, भारतीय गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करत यजमान संघाला १६१ धावांत रोखले होते. श्रीलंकेने निर्धारित २० षटकांत ९ बाद १६१ धावा करून भारतासमोर विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हार्दिक पांड्याने घातक वाटणाऱ्या परेराला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच षटकात त्याने कामिंदू मेडिंसलाही बाद केले. श्रीलंकेकडून कुसल परेराने सर्वाधिक धावा केल्या, त्याने २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ३४ चेंडूत ५३ धावा कुटल्या. त्याच्याशिवाय सलामीवीर पथुम निसांकाने (३२) धावांची खेळी केली. इतर श्रीलंकन फलंदाजांनी खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग या त्रिकुटाने प्रत्येकी २-२ बळी घेतले.
भारताचा संघ -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रियान पराग, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ -
चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश थीक्ष्णा, मथीशा पथिराना, असिथा फर्नांडो.
Web Title: SL vs IND 2nd T20 Match Score Live Updates Team India defeated Sri Lanka to take a 2-0 lead in the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.