SL vs IND 2nd T20 Match Score Live Updates | पल्लेकले : श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात स्फोटक खेळी करताना यशस्वी जैस्वालने ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या दिशेने कूच केली होती. तो विश्वविक्रमापासून केवळ सात धावांनी दूर होता. पण, रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात जैस्वालने यशस्वी कामगिरी पूर्ण केली. खरे तर यशस्वीने पहिल्या सामन्यात त्याच्या वैयक्तिक ४७ धावा केल्या असत्या तर तेव्हाच हा विक्रम झाला असता. मात्र, तो ४० धावांवर बाद झाल्यामुळे तो सात धावांमुळे विश्वविक्रमापासून वंचित राहिला होता. पण, दुसऱ्या सामन्यात त्याने स्फोटक खेळी केली आणि सात धावा करताच १ हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.
चालू अर्थात २०२४ या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा करणारा यशस्वी पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी यशस्वीला १ हजार धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या ७ धावांची आवश्यकता होती. (Yashasvi Jaiswal special achievement).
दरम्यान, दुसऱ्या सामन्यात यशस्वीने स्फोटक खेळी करून विजयाच्या दिशेने कूच केली. अखेरच्या ४ षटकांत टीम इंडियाला मालिका खिशात घालण्यासाठी ३३ धावांची गरज होती. यशस्वी जैस्वाल २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने १५ चेंडूत ३० धावा करून बाद झाला. त्याच्या स्फोटक खेळीला वानिंदू हसरंगाने ब्रेक लावला. तर सूर्यकुमार यादव (२६) मथीशा पथिरानाचा शिकार झाला. अखेर हार्दिक पांड्याने फिनिशिंग टच देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताने ६.३ षटकांत ३ बाद ८१ धावा करून विजय साकारला. हार्दिक पांड्याने १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ९ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या. श्रीलंकेकडून महीश थीक्ष्णा, मथीशा पथिराना आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
भारताचा संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रियान पराग, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ -चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश थीक्ष्णा, मथीशा पथिराना, असिथा फर्नांडो.