SL vs IND 3rd ODI Live Match | कोलंबो : श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात शुबमन गिलने घेतलेल्या कॅचमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या पंचांनी गिलने घेतलेला झेल बरोबर असल्याचे सांगितले अन् श्रीलंकेच्या कुसल मेंडिसला बाहेरचा रस्ता धरावा लागला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही फोटोंमुळे वाद रंगला आहे, ज्यामध्ये गिलचा पाय सीमारेषेजवळ असल्याचे दिसते. अखेरच्या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माने दोन मोठे बदल केले. रियान परागला पदार्पणाची संधी मिळाली आहे, तर रिषभ पंतलाही संघात जागा मिळाली आहे. तर अर्शदीप सिंग आणि लोकेश राहुल यांना डच्चू देण्यात आला. श्रीलंका आणि भारत यांच्यातील अखेरचा वन डे सामना कोलंबो येथे खेळवला जात आहे.
कुसल मेंडिस चांगल्या लयनुसार खेळत होता. त्याने ४ चौकारांच्या मदतीने ५९ धावांची अर्धशतकी खेळी केली. पण, ४९व्या षटकात कुलदीप यादवला षटकार मारण्याच्या प्रयत्नात मेंडिस बाद झाला. तो वादग्रस्त निर्णय असला तरी श्रीलंकन खेळाडूला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. दरम्यान, श्रीलंकेने सलामीचा सामना अनिर्णित करून भारताला मोठा धक्का दिला होता. त्यात त्यांनी दुसरा सामना जिंकून ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी मजबूत आघाडी घेतली. त्यामुळे आजचा अखेरचा सामना भारतासाठी 'करा किंवा मरा' असाच आहे. भारताचा आजचा विजय मालिका बरोबरीत संपवू शकतो. पण, सामना श्रीलंकेने जिंकल्यास अथवा अनिर्णित संपल्यास यजमान संघ मालिका जिंकेल.
भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ -चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानगे, कामिंदू मेंडिस, डुनिथ वेलालगे, महेश तीक्ष्णा, जेफरी वांडरस, असिथा फर्नांडो.